Mumbai Local for General Public: गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सर्वसामान्य जनतेसाठी लोकलचे दरवाजे बंद करण्यात आले होते. मात्र, 1 फेब्रुवारीपासून सरकारने नागरिकांना दिलासा देत विशिष्ट वेळेत सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू केली. मात्र, सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सुरू झाल्यानंतर पहिल्याचं दिवशी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील विना मास्क प्रवास करणाऱ्या एकूण 512 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. तसेच या प्रवाशांकडून प्रत्येकी 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या 396 प्रवाशांवर कारवाई करत 1 लाख 4 हजार 278 रुपयांचा दंड वसूल केला.
दरम्यान, मध्य रेल्वे मार्गावर 2 लाख 67 हजार 137 प्रवासी तिकिटांची आणि 42 हजार 582 प्रवासी पासची विक्री झाली. याशिवाय पश्चिम रेल्वेवर 2 लाख 32 हजार 578 तिकिटांची विक्री करण्यात आली. तसेच सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 7 लाख 19 हजार 847 प्रवाशांची भर पडली. मास्क परिधान न करणाऱ्या 515 प्रवाशांकडून 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. (वाचा - मुंबई करांना लोकल प्रवासाची मुभा मिळताच पहिल्या दिवशी CSMT स्टेशन मध्ये पहा काय आहे स्थिती (Watch Video))
सर्वांसाठी लोकलचे दरवाजे उघडल्यानंतर सोमवारी झालेल्या तिकीट विक्रीवरून 26 लाख प्रवाशांनी लोकलने प्रवास केला. याशिवाय मध्य रेल्वेवरील 12 हजार आणि पश्चिम रेल्वेवरील 10 हजार 756 प्रवाशांना पासची मुदत वाढवून देण्यात आली, असं रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलं.
दरम्यान, सोमवारी रेल्वेच्या तिजोरीत 2.09 कोटी रुपयांची भर पडली. सोमवारी मोबाइल अॅपच्या माध्यमातून मध्य रेल्वेवर 3 हजार 484 तिकिटे आणि 794 पास देण्यात आले. याशिवाय एटीव्हीएमच्या माध्यमातून 1 लाख 61 हजार 272 तिकिटांची विक्री करण्यात आली. सर्वांसाठी लोकल सुरू झाल्यानंतर पहिल्याचं दिवशी रेल्वेच्या महसूलात मोठी भर पडली.