Amit Shah Maharashtra Tour: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections 2024) च्या आधी, सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या निवडणूक रणनीती तयार केल्या आहेत. महाविकास आघाडीचा दावा आहे की, पुढचा मुख्यमंत्री त्यांच्या युतीचाच असेल. दुसरीकडे, राज्यातील विविध गोष्टींबाबत वाद, अंतर्गत कलह आणि तणावपूर्ण राजकीय वातावरणात महायुती सत्ता टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) उद्यापासून (24 आणि 25 सप्टेंबर) महाराष्ट्राच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी महायुती आघाडी पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.
महत्वाचे म्हणजे या दौऱ्यात ते पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या महाविकास आघाडीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जागांना भेटी देणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांच्या होमग्राऊंड विदर्भात हातून ताकद गमावली आहे. विदर्भातील 15 लोकसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसने 13 जागा जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. त्यामुळे शाह यांचा विदर्भ दौरा महत्वाचा समजला जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूर, विदर्भातील आहेत. आरएसएसचे मुख्यालयदेखील तिथेच आहे. त्यामुळे विदर्भात गमावलेली ताकद परत मिळवणे भाजपसाठी महत्त्वाचे आहे. आता शहा यांच्या दौऱ्यामुळे भाजपच्या निवडणूक रणनीतीचा आढावा घेतला जाईल. अमित शाह नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे भाजप कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. (हेही वाचा: Sharad Pawar: 'घरात आम्ही सर्व एकत्र असतो'; चिपळूणमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शदर पवारांची प्रतिक्रीया)
शाह यांचा या महिन्यातील हा दुसरा दौरा आहे. याआधी गणपती उत्सवानिमित्त त्यांनी मुंबईला भेट दिली होती आणि महायुतीतील अंतर्गत कलहाच्या धर्तीवर त्यांनी काही बैठकाही घेतल्या होत्या. दरम्यान, अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसनेही निवडणूक रणनीती आखून आपली सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. काँग्रेसचे आमदार आणि नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले होते की, लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आले. आता विदर्भातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे.