Amit Shah, Ashok Chavan | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र भाजप (Maharashtra BJP) अंतर्गत संघर्षामुळे धुमत आहे. वरवर पाहता सर्व काही अलबेल असल्याचे चित्र असले तरी, कार्यकर्त्यांच्या मनात मात्र मोठी अस्वस्थता आहे. कार्यकर्त्यांचा संयम सुटत चालला असून, ही अस्वस्थता केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांच्या तोंडावर व्यक्त करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. निमित्त ठरले शाह यांचा महाराष्ट्र दौरा आणि कार्यकर्ता संवाद मेळावा. या मेळाव्यात एका पदाधिकाऱ्याने थेट राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याकडे बोट दाखवत भावना व्यक्त केली. ज्याची राज्याच्या आणि पक्षाच्याही वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

भाजप कार्यकर्ते अस्वस्थ

लोकसभा निवडणूक 2024 पासून महाराष्ट्र भाजप अस्वस्थ आहे. खास करुन आपण राज्यातील सर्वात मोठा पक्ष आणि सत्तेतही असून सत्तेत नसल्यासारखी अवस्था का आहे? ही भावना कार्यकर्त्यांच्या निराशेस कारणीभूत ठरत आहे. त्यातच पक्षातील निष्ठावानांपेक्षाही बाहेरुन आलेल्यांना संधी मिळाल्याने ती अधिक वाढत आहे. केंद्रीय गृहमंत्री, भाजप नेते अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात ती अधिक ठळक झाली. शाह यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी नुकताच एक संवाद मेळावा घेतला. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले असले तरी, बाहेरुन पक्षात घेतल्यामुळे भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे ना? असा सवाल विचाला. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी थेट अशोक चव्हाण यांच्याकडेच बोट दाखवले. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Loksabha Election 2024: कोंढा गावात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या ताफ्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न, पाहा संतापलेल्या गावकऱ्यांचा Video)

माधव भंडारी यांच्या मुलानेही व्यक्त केली खदखद

भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचे लपून राहिले नाही. या आधीही अशा प्रकारची खदखद बोलून दाखविण्यात आली आहे. राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी फेब्रुवारी 2024 मध्ये निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी माधव भंडारी यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर करताना मात्र त्यांचे नाव वगळण्यात आले. भंडारी हे पाठिमागील अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रीय आहेत. खास करुन प्रदीर्घ काळ ते प्रवक्ता राहिले आहेत. मात्र, संघटनेत त्यांना संसदीय पातळीवर कोणतेही पदमिळाले नाही. या पार्श्वभूमीवर त्यांचा मुलगा चिन्मय भंडारी यांनी सोशल मीडियावर प्रदीर्घ पोस्ट लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. (हेही वाचा, Madhav Bhandari's Son Tweet: चिन्मय भंडारी यांची पोस्ट चर्चेत; 'वडील माधव भंडारी 50 वर्ष पक्षासोबत पण 12 वेळा फक्त नाव चर्चेत, उमेदवारी नाही')

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. निवडणूक आयोगाकडून त्याची घोषणा केव्हाही केली जाईल, अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकासआघाडी रणनिती आखत आहे. आतापर्यंत आलेल्या विविध सर्व्हेक्षणांमध्ये राज्यातील जनतेचा कल महाविकासआघाडीतील घटकपक्षांसोबत म्हणजेच शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस पक्षाकडे असल्याचे दिसले आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अधिक सतर्क झाला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे दैरेही महाराष्ट्रा वाढले आहेत.