नवी मुंबई: खोपटा पुलाखाली ISIS च्या नावे संदेश लिहिणारा अमीर उल्लाह अजिउल्लाह शेख पोलिसांच्या ताब्यात, कोर्टाने सुनावली 7 दिवसांची पोलिस कोठडी
CRIME | (Image Courtesy: Archived, Edited, Symbolic Image)

नवी मुंबई परिसरातील आणि रायगड (Raigad) जिल्ह्यातील उरण (Uran) तालुक्यात असलेल्या खोपटा (Khopata Bridge) पुलाखाली आयसीस (ISIS) या दहशतवादी संघटनेच्या नावे आक्षेपार्ह मजकूर लिहून दहशत पसवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अमीर उल्लाह अजि उल्लाह शेख (Amir Ullah Aij Ullah Sheikh) असे आरोपीचे नाव आहे. तो 33 वर्षांचा आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीस न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. खोपटा पुलाखाली आढळून आलेल्या संदेशानंतर नवी मुंबई, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर अवघ्या 72 तासांत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दरम्यान, आरोपी अमीर उल्लाह अजिउल्लाह शेख याच्यावर भारतीय दंड संहिता 153अ/ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याबद्दलही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार आरोपी हा मुळचा उत्तर प्रदेश राज्यातील सिद्धार्थ नगर येथील राहणारा आहे. तो गेली 10 वर्षे खोपटा येथे भाडेतत्वावर राहतो. आरोपी अमीर उल्लाह याने हा संदेश नेमका का आणि कशासाठी लिहिला याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. दरम्यान, पोलिसांनी जाहीरपणे याबाबत कोणतीही माहिती देणे टाळले आहे. मात्र, आरोपीकडून आणखी काही धागेदोरे मिळतात का याबाबत तपास सुरु आहे.

नवी मुंबई (Navi Mumbai) शहरालगत असलेल्या उरण येथील खोपटा (Khopte Bridge Navi Mumbai) पुलाच्या खांबांवर आयसिस या दहशतवादी संघटनेच्या नावाने संदेश लिहिण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेची गांभीर्याने नोंद घेत पोलीस यंत्रणाही सतर्क झाली होती. पोलीसांनी सतर्कतेचे आदेश देत तपासही सुरु केला होता. उरणच्या खोपटा पुलावर लिहिण्यात आलेले संदेश हे काळ्या शाईच्या मार्करने लिहिण्यात आले होते. या संदेशात बगदादी, हाफिस सईद, आयसीस अशी आक्षेपार्ह नावं आहेत. हा संदेश देवनागरी आणि इंग्रजी भाषेत लिहिण्यात आला आहे. यातील देवनागरी भाषेतील संदेश हे सहज वाचता येण्यासारखे होते. (हेही वाचा, नवी मुंबई: उरण येथील खोपटा पुलावर ISIS चे संदेश, पोलीस सतर्क)

ज्या ठिकाणी हे संदेश आढळून आल्या. त्या ठिकाणी दारुच्या काही रिकाम्या बाटल्याही सापडल्या होत्या. त्यामुळे हा संदेश कोणी दारुच्या नशेत तर लिहिला नाही ना? असा संशय निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी कोणतीही कसर न सोडता सर्व बाजूने तपास करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 72 तासात अमीर उल्लाह अजिउल्लाह शेख याला आज अटक केली.