नवी मुंबई: उरण येथील खोपटा पुलावर ISIS  चे संदेश, पोलीस सतर्क
Terrorists | Image Used for Representational Purpose | (Photo Credits: ANI) |

नवी मुंबई (Navi Mumbai) शहरालगत असलेल्या उरण येथील खोपटा (Khopte Bridge Navi Mumbai) पुलाच्या खांबांवर आयसिस या दहशतवादी संघटनेच्या नावाने संदेश लिहिण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची गांभीर्याने नोंद घेत पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. पोलीसांनी सतर्कतेचे आदेश देत तपासही सुरु केला आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिणीने दिलेल्या वृत्तानुसार, उरणच्या खोपटा पुलावर लिहिण्यात आलेले संदेश हे काळ्या शाईच्या मार्करने लिहिण्यात आले आहेत. या संदेशात बगदादी, हाफिस सईद, आयसीस अशी आक्षेपार्ह नावं आहेत. हा संदेश देवनागरी आणि उर्दू भाषेत लिहिण्यात आला आहे. यातील देवनागरी भाषेतील संदेश हे सहज वाचता येण्यासारखे आहेत.

ज्या ठिकाणी हे संदेश आढळून आले आहेत त्या ठिकाणी दारुच्या काही रिकाम्या बाटल्याही सापडल्या आहेत. त्यामुळे हा संदेश कोणी दारुच्या नशेत तर लिहिला नाही ना? असा संशय निर्माण झाला आहे. पोलिसांनी सर्व बाजूने तपास करण्यास सुरुवात केली आहे. (हेही वाचा, उत्तर प्रदेशमध्ये ISISचा नवा चेहरा उघडकीस?; RSSचे कार्यालय होते निशाण्यावर)

दरम्यान, उरण हा परिसर गेल्या काही काळापासून अत्यंत संवेदनशील ठरला आहे. कर्नाटक आणि देशातील काही ठिकाणी दहशतवादी घुसल्याची माहिती मिळल्यानंतर गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचे आदेश दिले होते. उरणमध्ये आढळलेल्या संदेशाच्या पार्श्वभूमिवरही पोलिसांनी तपास सुरु केला आहे.