राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून 1 ते 11 एप्रिल दरम्यान 1 कोटी 16 लाख 84 हजार शिधापत्रिका धारकांना तब्बल 31 लाख 81 हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप - छगन भुजबळ
Chhagan Bhujbal (PC - Facebook)

राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून 1 ते 11 एप्रिल दरम्यान 1 कोटी 16 लाख 84 हजार शिधापत्रिका धारकांना तब्बल 31 लाख 81 हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना लॉकडाऊन काळात स्वस्त दरात अन्नधान्यांचे वाटप करण्यात येत आहे.

याशिवाय स्थलांतरित झालेले परंतु, लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या 5 लाख 52 हजार 170 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहेत, त्याठिकाणी शासनाच्या पोर्टेबिलीटी यंत्रणेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा 1761 वर पोहोचला; आज 187 नव्या कोरोना बाधितांची नोंद ; 11 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

दरम्यान, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत पात्र रेशनकार्ड धारकाच्या नियमित स्वस्त धान्य खरेदीसोबत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला एप्रिल ते जूनपर्यंत 5 किलो अतिरिक्त मोफत तांदूळ वाटप करण्यात येत आहेत. यासाठी भारतीय खाद्य निगम कडून 3 लाख 50 हजार 82 मे. टन नियतन प्राप्त झालं असल्याचंही छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.