Akola Accident (Image Credit - Amol Mitkari Twitter)

अकोला जिल्ह्याला (Akola) रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) तडाखा बसला आहे. या वादळी वाऱ्यामुळे बाळापूर तालुक्यातील पारस येथे समर्थ बाबूजी महाराज संस्थान मंदिराच्या (Samarth Babuji Maharaj)  छतावर एक मोठे वृक्ष उन्मळून पडले. यामध्ये 40 पेक्षा अधिक जण दबले होते. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 30 ते 40 जण जखमी झाले आहेत. बाबूजी महाराज मंदिरात ही दुर्घटना घडली. रविवारी रात्री 9च्या सुमाराला मंदिरात 50 ते 60 भाविक होते. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु असल्याने यावेळी मंदिराच्या बाजुला असलेले लिंबाचे झाड शेडवर कोसळंलं. जोरदार पाऊस असल्यामुळे याठिकाणी प्रशासन आणि ग्रामस्थांकडून सुरु असलेल्या मदतकार्याल अडचणी येत होत्या.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यातलं पारस काल संध्याकाळी चांगलंच हादरलं. गावातील बाबूजी महाराज मंदिरात रविवारी लगतच्या जिल्ह्यांसह राज्यातून भाविकांची मोठी गर्दी असते. रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मंदिरात आरती झाली. आरतीनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे बाहेर असलेल्या भाविकांनी मंदिरात असलेल्या टिनाच्या शेडवर सहारा घेतला. अन् नेमकं याचवेळी वाऱ्यामुळे मंदिरासमोर असलेलं लिंबाचं झाड शेडवर कोसळलं. दुर्घटनेबाबत माहिती मिळताच प्रशासनाचं पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचलं. यासोबतच ढिगारा हटवण्यासाठी जेसीबी आणि जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या.

आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत दुर्घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. "पारस जि. अकोला येथे बाबूजी महाराज मंदिरात आरती चालू असताना टिन शेड वर झाड कोसळून अनेक भाविक जखमी तसेच चार भाविक मृत्यु मुखी पडल्याची मिळाल्याची, दुःखद बातमी समजली, सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन मृतकांच्या नातेवाईकांना तात्काळ भरघोस मदत जाहीर करावी." असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहले आहे.