Ajit Pawa | (Photo Credit: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) बराच काळ सार्वजनिक कार्यक्रमात अथवा प्रसारमाध्यमांपुढे आलेले दिसले नाहीत. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह उद्गारानंतरही अजित पवार यांची प्रतिक्रिया कुठे पाहायला मिळाली नाही. शिर्डी येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमातही अजित पवार यांची अनुपस्थिती उल्लेखनीय राहील. त्यामुळे प्रसारमाध्यमांसह राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होती. दरम्यान, आता अजित पवार यांनीच या सर्व गोष्टींवर खुलासा केला आहे. हा खुलासा करताना त्यांनी प्रसारमाध्यमांवरही नाराजी व्यक्त केली आहे.

अजित पवार यांना एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला की, बराच काळ झाले अजित पवार सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. तसेच, सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह विधान झाले. राष्ट्रवादीचा मेळावाही पार पडला. या सर्वांमध्ये अजित पवार यांची प्रतिक्रिया कुठेच पुढे आली नाही. यावर बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, 'मध्यंतरी मला खोकल्याचा त्रास होता. नंतर काही दिवस मी दौऱ्यावर होतो. रात्री उशीरा आलो. इथं काहीही बातम्या देतात, काहीही फालतू बातम्या देतात', असे म्हणत त्यांनी प्रसारमाध्यमांवरही नाराजी व्यक्त केली. (हेही वाचा, Supriya Sule On Abdul Sattar: अब्दुल सत्तार यांच्या विधानावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, काय म्हणाल्या घ्या जाणून)

अजित पवार यांनी पुढे सांगितले की, मागची बरीच वर्षे मी विदेशात गेलो नव्हतो. त्यामुळे विदेशात जाण्याचा कार्यक्रम आगोदरच ठरला होता. त्यासाठी पाच-सहा मिहिने आगोदर तिकीटे काढली होती. माझा तो खासगी दौरा होता. त्यामुळे काही ठिकाणी मला उपस्थित राहता आले नाही. असे असताना प्रसारमाध्यमांनी मात्र इकडं बातम्या चालवल्या. मला कळत नाही अजित पवारमुळे यांचं काय नडतं. काही झाले की अजित पवार. अरे अजित पवारला काही खासगी आयुष्य आहे की नाही? उगाच आपले उठसूठ काहीही बातम्या देत राहतात असे अजित पवार म्हणाले.