Ajit Pawar |

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी काळात राज्यातील विविध बाबींवर निर्बंध घातले होते. कोरोना व्हायरस (COVID-19) संक्रमितांची संख्या जसजशी कमी होत आहे, तसतसे निर्बंध शिथील केले जात आहेत. आताबर्यंत बंद असलेल्या बाबी अंदाज घेऊन टप्प्या टप्प्याने सुरु केल्या जात आहेत. कोरोना संक्रमितांची संख्या अशीच कमी होत गेली तर हे सर्वच निर्बंध हळूहळू कमी केले जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही तसाच मनोदय असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार बोलत होते.

अजित पवार यांना पत्रकारांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याबाबत प्रश्न विचारला असता, परमबीर सिंह कोठे आहेत याबाबत राज्य सरकारला माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवरुन विरोधकांनी आणि महाविकासआघाडी सरकारमधील काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. आघाडी सरकारमध्ये सर्वानुमते निर्णय घेतला की त्यावर सर्वांनी समाधानी राहायचं असतं. निर्णय घेईपर्यंत सर्वजण भूमिका मांडत असतात. एकदा निर्णय घेतला की सर्वांनीच त्याचे समर्थन करायचे असते.घेतलेल्या निर्णयाव उगाच वेगळी मते व्यक्त करुन गैरसमज पसरवायचे नसतात, असे अजित पवार म्हणाले. (हेही वाचा, धक्कादायक! महाराष्ट्रातील खाजगी रुग्णालयांमध्ये 75 टक्के Covid-19 रुग्णांकडून आकारले ज्यादा बिल; अनेक कुटुंबे झाली कर्जबाजारी)

राज्यात मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मदत पोहोचली आहे काही ठिकाणी पोहोचत आहे. ज्या ठिकाणी पाण्यामुळे पाहणी करता येत नाही अशा ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने पाहणी केली जाईल. एसडीआरएफचा निधी केंद्र सरकारकडून मिळतो. त्या निधीतून मदत करण्यास सांगितले असेल तर त्यावर आमचा आक्षेप नाही. मात्र, निधीवाटपात केंद्र सरकार दुजाभाव करते आहे. हे लपूनही राहिले नाही आणि अनेकदा दिसूनही आले आहे. एका राज्याला एक आणि दुसऱ्या राज्याला वेगळी अशी वागणूक केंद्र सरकार घेते आहे. राज्य हा देशाचाच घटक आहे हे ध्यानात घेऊनच केंद्राने मदत करावी असे अजित पवार म्हणाले.