Anant Chaturdashi 2019: अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट बसच्या वाहतूकीमध्ये बदल; काही मार्गावरील फेर्‍या रद्द
BEST Bus (Photo Credits: commons.wikimedia)

मुंबईमध्ये अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) दिवशी 10 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे. सार्वजनिक गणपतींसोबतच उद्या घरगुती गणपतींचं देखील विसर्जन होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी उद्या सकाळपासूनच मोठी गर्दी उसळणार आहे. या पार्श्वभूमीवर आता बेस्ट बसने काही मार्गावरील वाहतूकीमध्ये बदल केला आहे तर काही मार्गावरील वाहतूक दुपारी 12 वाजल्यानंतर वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. मुंबईत गिरगाव चौपटी, जुहू चौपाटी, दादर चौपाटीसह तलावांवर अनेक लहान मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं. उद्या अनंत चतुर्दशी दिवशी मोठ्या गणपतींच्या विसर्जन मिरवणूकींना वाट मोकळी करून देण्यासाठी बेस्ट वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.  Ganesh Visarjan 2019 Muhurat: यंदा दीड, 5,7 आणि 10 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन करण्याचे मुहूर्त काय?

BEST Bus Transport ट्वीट

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्राफिकच्या मार्गांमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. पोलिसांनी कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी सामान्य वाहतूकदेखील वळवली आहे. लालबाग, परळ भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहे. लालबागचा राजा सकाळी 10 च्या सुमारास मंडपातून बाहेर पडेल त्यानंतर रात्रभर मिरवणूकीनंतर दुसर्‍या दिवशी पहाटे त्यांचं गिरगावच्या चौपाटीवर विसर्जन होतं. त्यामुळे सामान्य मुंबईकरांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आले आहेत.