लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे काय? 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकाशनानंतर उदयनराजे भोसले यांचा संतप्त सवाल
Udayanraje Bhosale | (Photo Credits: ANI)

केवळ महाराष्ट्र, भारतच नव्हे तर जगभरातील लोक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांना मानतात. त्यांची उंची आजवर कोणी गाठली नाही. यापुढेही गाठू शकणार नाही. महापुरुष हा एकदाच जन्माला येत असतो. त्यामुळे त्यांच्याशी कोणाची तुलना होऊ शकत नाही. लोक उगाचच तुलना करण्याचा प्रयत्न करतात, असे सांगतानाच अशी तुलना करणाऱ्या लोकांनी आपली बुद्धी गहाण ठेवली आहे काय? असा संतप्त सवाल उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी विचारला आहे. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' (Aaj Ke Shivaji -Narendra Modi) हे पुस्तक आणि या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर निर्माण झालेल्या वादानंतर उदयनराजे भोसले पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडत होते. विशेष म्हणजे या पुस्तकाचे प्रकाशन भाजप कार्यालयात झाले आहे त्याबाबत उदयनराजे भोसले यांनी एक शब्दही काढला नाही.

जय भगवान गोयल नावाच्या कोणा एका लेखकाने 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पुस्तक लिहिले आहे. मी हे पुस्तक वाचले नाही. माझ्यापर्यंत पोहोचले नाही. पण, या सर्व प्रकारामुळे मला प्रचंड वेदना झाल्या वाईट वाटले. समाजात काही लोक जे बिनपट्ट्याचे असतात ते उगाचच लूडबूड करतात. तुलना करत बसतात त्याचे नाव घेऊन मी उगाच त्याला मोठे करणार नाही. तो मोठा नव्हताच कधी, असे म्हणत आणि नामोल्लेख टाळत उदयनराजे भोसले यांनी लेखक जय भगवान गोयल यांना जोरदार टोला लगावला. (हेही वाचा, 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पुस्तक म्हणजे ढोंग, चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना: शिवसेना)

एएनआय ट्विट

शिवाजी महाराजांबद्दल कोणी काही बोलले की लगेच त्यांच्या वंशजांना विचारा असे म्हणत घराण्याकडे बोट दाखवले जाते याला प्रत्युत्तर देताना उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. या वेळी ते म्हणाले, शिवसेना काढली त्या वेळी महाराजांच्या वंशजांना विचारले काय? महाशिवआघाडी हा शब्दप्रयोग करताना छत्रपतींच्या वंशजांना विचारले होते काय? इतकेच नव्हे तर आता महाविकास आघाडी सरकार म्हणतात शिवाजी महाराजांबद्दल इतकेच प्रेम आहे तर, 'शिव' हा शब्द का काढला? आता केवळ महाविकाआघाडी असाच शब्द राहिला आहे. इतकेच नव्हे तर शिववडा आणि इतर कसल्याही पदार्थांसाठी शिवाजी महाराजांचा संदर्भ वापरला जातो, अशी टीकाही उदयनाराजे भोसले यांनी या वेळी केली.