'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पुस्तक म्हणजे ढोंग, चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना: शिवसेना
Jai Bhagwan Goyal | (Photo Credits: Facebook)

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' (Aaj Ke Shivaji -Narendra Modi) हे पुस्तक म्हणजे ढोंग, चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना आहे. महाराष्ट्रातील भाजप (BJP) पुढाऱ्यांनी या ढोंगी प्रकाराचा खुल्या दिलाने निषेध केला पाहिजे, अशा शब्दांत शिवसेनेने भाजप कार्यालातून प्रकाशित झालेल्या पुस्तकावर टीका केली आहे. तसेच, भाजपलाही चिमटे काढले आहेत. 'भाजपचे नवे शिवाजी; आमचे छत्रपती शिवराय!' या मथळ्याखाली लिहिलेल्या शिवसेना मुखपत्र दै. सामना संपादकीयात 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन भाजपवर टीका करण्यात आली आहे. जय भगवान गोयल या भाजप नेत्याने लिहिलेले हे पुस्तक प्रकाशनापासूनच वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. या पुस्तकावरुन महाराष्ट्र आणि राजधानी दिल्लीतही राजकारण तापले आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि शिवाजी महाराजांचे अनुयायी यांनी या पुस्तकाच्या शिर्षकात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची तुलना करण्यात आल्याने निषेध व्यक्त केला आहे.

दरम्यान, आजच्या सामना संपादकियात म्हटले आहे की, आता भाजपवाले म्हणतात, गोयलशी आमचा काय संबंध? संबंध नाही कसा? पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले व भाजपचे नेते त्या वेळी हजर होते. यावर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनीच बोलायचे आहे. 11 कोटी जनता बोलते आहेच. छत्रपती शिवरायांचे वारसदारही आता चिडले आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला आहे. शिवरायांच्या वंशजांनी म्यानातून सपकन तलवार काढावी. ती आता काढली आहे व त्याबद्दल त्यांचे आभार. भाजपची तोंडे 'म्यान' झाली म्हणून आम्ही हे शिवव्याख्यान मांडले, असेही या संपादकियात म्हटले आहे.

या संपादकियात पुढे असे म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदी यांच्यासोबत करण्यात आल्याने महाराष्ट्रात संतापाची वावटळ उठली आहे. त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. ही वावटळ पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात नाही हे समजून घेतले पाहिजे. मोदी यांच्या पाठिमागे हे सर्व उद्योग सुरु आहेत. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असे एक पुस्तक भाजपच्या नव्या कोऱ्या चमच्याने लिहिले. त्या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात झाले. महाराष्ट्राच्या अकरा कोटी जनतेला हे अजिबात आवडले नाही. (हेही वाचा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारसदारांनी भाजपमधून राजीनामे द्यावेत; 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तक वादावर शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक)

श्री मोदी हे कर्तबगार आणि लोकप्रिय नेते आहेत, देशाचे पंतप्रधान म्हणून आज त्यांना तोड नाही. पण, तरीही ते देशाचे छत्रपती शिवाजी आहेत काय? त्यांना छत्रपती शिवरायांचे स्थान देणे योग्य आहे काय? याचे उत्तर एका सुरात नाही.. नाही असेच आहे. त्यांची तुलना जे शिवाजी महाराज याच्याशी करतात त्यांना शिवाजी महाराज समजलेच नाहीत. पंतप्रधान मोदी यांनाही ही तुलना आवडली नसेल, पण फाजी उत्साही भक्त आपल्या नेत्यांना अडचणीत आणतात तसे झाले आहे, असा घणाघात शिवसेनेने मुखपत्र सामनातून केला आहे.