Nawab Malik Arrest: महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मंत्रालयाजवळ आंदोलनाला सुरूवात
NCP| PC: Twitter/ANI

महाराष्ट्राचे मंत्री आणि एनसीपी नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून (ED) अटक करून त्यांना 3 मार्च पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिकांवरील ही कारवाई आकसबुद्धीने केल्याचं सांगत महाविकास आघाडीने आपला निषेध नोंदवत मंत्रालयाजवळ (Mantralay) असलेल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलनाला सुरूवात केली आहे. महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपी मधील महत्त्वाचे नेते, आमदार सध्या आंदोलन स्थळी उपस्थित आहेत. नक्की वाचा:  Nawab Malik ED Custody: ईडीची कोठडी सुनावल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी केले 'हे' ट्वीट .

नवाब मलिकांना ईडीने अटक केली असली तरीही त्यांच्याकडून राजीनामा घेण्यासाठी राज्यात विरोधीपक्ष भाजपा मुख्य मागणी करत आहे पण नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचं एनसीपी कडून सांगण्यात आले आहे. काल रात्री नवाबांना कोठडी सुनावण्यात आल्यानंतर शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि नंतर आंदोलनाचा निर्णय झाला आहे.

मुंबईत ईडीने अंडरवर्ल्ड संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील एका आरोपीकडून कुर्ला परिसरात जमीन खरेदी झाली. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार शाह वली खान आणि मोहम्म सलीम पटेल यांचे मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंध असून मलिक कुटुंबाच्या मालिकीच्या कंपनीने त्यांच्याकडून कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हे खळबळजनक आरोप केले आहेत.