Dhananjay Munde (Photo Credit: Twitter)

Dhananjay Munde Discharged After Recovery From COVID19: कोरोनाचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरत चालले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राजकीय नेते आणि कलाकारांसह खेळाडूदेखील कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनावर मात केली आहे. आज संध्याकाळी चारच्या सुमारास त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी हात उंचावून रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत. सर्वांच्या आशिर्वादाने आणि प्रेमाने मी कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालो, असेही ते म्हणाले आहेत.

धनंजय मुंडे यांना गेल्या काही दिवसांपूर्वी श्वास घेताना त्रास होत असल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर 12 जून रोजी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ज्यामुळे मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या 11 दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र, त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच पुढील 14 दिवस त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनावर मात केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने मी कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालो. आज डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र, रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी माझी काळजी घेतली. या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, अशा आशायाचे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच कोरोनाबाबत कोणत्याही व्यक्तीने हलगर्जीपणा करू नका, सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. आपण कोरोनारुपी संकटावर नक्की मात करू, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. हे देखील वाचा- 'परप्रांतीय मजूर पुन्हा जर महाराष्ट्रात येणार असतील तर...'; मनसे नेते अमित ठाकरे यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मागणी

धनंजय मुंडे यांचे ट्विट-

धनजंय मुंडे यांनी कोरोनावर मात केल्याची बातमी कानावर पडताच त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. घनंजय मुंडे हे महाविकास आघाडीतील तिसरे नेते आहेत, ज्यांना कोरोनाची लागण झाली होती. याआधी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.