कोणताही शिवसैनिक इंदिराजींबद्दल अपशब्द काढणार नाही: आदित्य ठाकरे यांच्याकडून संजय राऊत यांची पाठराखण
Shiv Sena leader Aaditya Thackeray (Photo Credits: Instagram)

Aditya Thackeray On Sanjay Raut's Comment: संजय राऊत यांनी बुधवारी एक कार्यक्रमादरम्यान केलेल्या काही वक्तव्यांमुळे महाविकासआघाडीचे संबंध बिघडतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना, आदित्य ठाकरे यांनी मात्र शिवसेनेची बाजू स्पष्ट केली आहे. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीविषयी संजय राऊत यांनी लोकमतच्या कार्यक्रमात एक वक्तव्य केले होते. मात्र त्याचे स्पष्टीकर देत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, “शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जे विधान केले, ते वेगळ्या कारणांमुळे होते. कोणताही शिवसैनिक इंदिराजींबद्दल अपशब्द काढणार नाही.”

पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, "संजय राऊत यांनी जे विधान केले आहे. ते वेगळ्या कारणांमुळे केले आहे. करीम लाला हे एक पठान नेते होते. त्यानंतर जे काही असेल ते मला माहित नाही."

इंदिरा गांधींविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “इंदिरा गांधींबद्दल स्वत: शिवसेना प्रमुख आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदर होता. त्यांच्याबद्दल कोणताही शिवसैनिक अपशब्द काढण्याचा विचारसुद्धा करणार नाही. यापूर्वी किंवा यानंतरही कोणताही शिवसैनिक इंदिरा गांधींबद्दल बोलणार नाही.”

'संजय राऊत एक नंबरचे फेकाडे,' मनसे कार्यकर्त्यांवर केलेल्या आरोपाला संदीप देशपांडे यांचे उत्तर

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना आदित्य म्हणाले, “संजय राऊत यांनी जे कोणतेही विधान केले असेल, त्याबद्दल रेफरन्सने बघणं आवश्यक आहे. आता त्यांनी स्वत: याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.”

दरम्यान, संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर कालपासून महाराष्ट्रात चर्चांना उलट सुलट उधाण आलं आहे. काँग्रेसकडूनही तीव्र नाराजी व्यक्त झाली. म्हणूनच आज (16 जानेवारी) संजय राऊत यांनी नरमाईची भूमिका घेत आपले वक्तव्य मागे घेतले आहे.