Sandeep Deshpande's Comment On Sanjay Raut: शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी बुधवारी लोकमत या वृत्तसंस्थने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केलेल्या काही वक्तव्यांमुळे ते मोठ्या अडचणीत आले आहेत. राज ठाकरे यांच्या समर्थकांनी आपली गाडी जाळली होती असा आरोप त्यांनी या कार्यक्रमात बोलताना केला होता. याच आरोपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज उत्तर दिलं आहे. "संजय राऊत हे एक नंबरचे फेकाडे आहेत," असं संदीप देशपांडे यांनी आज एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
आज दिलेल्या मुलाखतीत संदीप देशपांडे म्हणाले, "संजय राऊत हे एक नंबरचे फेकाडे असून राज ठाकरे यांनी त्यांना सामनामध्ये आणले होते. राज ठाकरेंनी त्यांना सामनामध्ये आणले नसते तर आज राऊत कुठेतरी कारकुनी करत असते."
इतकंच नव्हे तर ते असंही म्हणाले की, “संजय राऊत यांना आता तिन्ही पक्षांचे सरकार आल्यानंतर काही काम उरलेले नाही. त्यामुळे काहीतरी वक्तव्ये करुन चर्चेत रहायचं म्हणून ते असं बोलत आहेत.”
राज ठाकरे यांचं राज्य छोटं असलं, तरी ते त्या राज्याचे राजे आहेत: संजय राऊत
दरम्यान, बुधवारी पुण्यात लोकमतच्या कार्यक्रमात संजय राऊत यांना राज ठाकरे यांच्या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली असल्याचे सांगितले. तसेच राज ठाकरे यांच्या शिवसेनेपासून वेगळं होण्याच्या निर्णयाबाबत बोलताना राऊत म्हणाले, ""राज ठाकरे यांनी स्वतःचा मार्ग निवडला आहे, त्यांनी त्या मार्गाने पुढे जावं. आम्ही कसं म्हणणार तुमचं राज्य खालसा करा? राज्य छोटं असलं, तरी ते त्या राज्याचे राजे आहेत."