Sanjay Raut Talks About Raj Thackeray: राज ठाकरे यांनी शिवसेनेला राम राम करत स्वतःचा पक्ष सुरु केला असला तरी संजय राऊत आणि ते अजूनही तितकेच चांगले मित्र आहेत. त्यांच्या मैत्रीचं उदाहरण द्यायचं झालं तर संजय राऊत यांनी नुकतंच राज ठाकरे यांच्याबद्दल मांडलेलं एक मत.राज ठाकरे यांचं राज्य छोटं असलं, तरी ते त्या राज्याचे राजे आहेत, असं मत नुकताच संजय राऊत यांनी एका कार्यक्रमादरम्यान मांडलं आहे.
‘लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्या’मध्ये संजय राऊत उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान, राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत राज ठाकरे व त्यांच्या पक्षाबद्दल बोलताना, राऊत म्हणाले, "राज ठाकरे यांनी स्वतःचा मार्ग निवडला आहे, त्यांनी त्या मार्गाने पुढे जावं. आम्ही कसं म्हणणार तुमचं राज्य खालसा करा? राज्य छोटं असलं, तरी ते त्या राज्याचे राजे आहेत."
दरम्यान, काही काळापासून अशा बातम्या येत आहेत की राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढील निवडणुका लढण्याची शक्यता आहे. त्याबद्दल एक मित्र म्हणून सल्ला देत, संजय राऊत म्हणाले, "भाजपला राज ठाकरेंना घेऊन राजकारण करायचं असेल, तर उत्तर भारतीयांविषयी असलेल्या मतांबद्दल फिरावं लागेल. आपल्याला जे झेपेल ते त्यांनी करावं."
लोक मला गुंड म्हणायचे, मी दाऊद इब्राहिम यालाही दम दिला आहे: संजय राऊत
राज ठाकरे आणि त्यांच्या मैत्रीविषयी बोलताना ते म्हणाले की राज ठाकरे आजही त्यांचे मित्र आहेत. त्यांनी पक्ष स्थापन केला असल्याने त्यांचं ते बघतील. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे आमचं सरकार आहे. मी त्यावेळी त्यांना सांगायला गेलो होतो, असा वेगळा विचार करु नका, पण त्यावेळी गाडी जाळली गेली. राज ठाकरे यांना त्यावेळी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र आज त्यांचा पक्ष थांबला.