लोक मला गुंड म्हणायचे, मी दाऊद इब्राहिम यालाही दम दिला आहे: संजय राऊत
Sanjay Raut | Photo Credits: Twitter

एकेकाळी मला गुंड म्हटले जायचे. पत्रकारीतेत असल्यामुळे मी अनेकांचे फोटो काढले आहेत. इतकेच नव्हे तर, समोर कोणीही असो मी कोणालाही घाबरत नाही. मग ते पंतप्रधान असो, गृहमंत्री असो की गुंड. तुम्ही कुणाला घबरला नाहीत तर कुणीच तुमचे वाकडे करु शकत नाही, असे सांगतानाच मी दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याला पाहिले आहे. त्याच्याशी बोललो आहे आणि त्याला दमही दिला आहे, असे शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेही माझी फायर ब्रँड एडिटर अशी अनेक ओळख करून देत असत, अशी आठवणही संजय राऊत यांनी सांगितली आहे. पुणे येथे आयोजित कार्यक्रमात खासदार संजय राऊत बोलत होते. या वेळी राऊत यांनी पत्रकारितेतील आपल्या कारकिर्दीबद्दल विचारलेल्या विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरं दिली.

या वेळी बोलताना आता पुर्वीसारखे काहीच राहीले नाही. अगदी अंडरवर्ल्डही राहिले नाही. त्या काळात अंडरवर्ल्ड काय होतं हे आम्ही जवळून पाहिले आहे. एक काळ होता मुंबईचे अंडरवर्ल्ड अगदी शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक भयानक होते. एखाद्या गुंडाला भेटण्यासाठी अख्ख मंत्रिमंडळही खाली येत असे. इतकेच काय करीम लाला याला भेटायला खुद्द माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी आल्या होत्या. एकेकाळी लोक मलाही गुंड म्हणत असंत. असो काही हरकत नाही. गुंड याचा अर्थ चांगलं काम करणारा माणूस. आपल्याकडे म्हटलंच जातं पुत्र व्हावा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा', अशी मिष्कील टिप्पणीही राउत यांनी या वेळी केली. (हेही वाचा, देशी लेनने शिवरायांची अस्मिता पणाला लावली आहे, सुधीर मुनगंटीवार यांच्या बाळबोध प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान मोदीच देतील: शिवसेना)

दरम्यान, हे सरकार खिचडी सरकार आहे. या सरकारचा रिमोट शरद पवार यांच्या हातात आहे, असे म्हटले जाते असे विचारले असता हा आरोप फेटाळून लावत संजय राऊत म्हणाले, या सरकारला कुणीही खिचडी सरकार म्हणत नाही. या सरकारला लोक सरकार असेच म्हणतात. तसेच, या सरकारचा रिमोट शरद पवार यांच्या हातात आहे, या बोलण्याला काही अर्थ नाही. शरद पवार हे राज्य सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करत नाहीत, असे म्हटले.