या आधी जेम्स लेन (James Lanee) याच्या पुस्तकावरुन महाराष्ट्र पेटलाच होता व आता देशी लेनने शिवरायांची अस्मिता पणाला लावली आहे, असा घणाघात शिवसेना मुखपत्र (Shiv Sena Mouthpiece सामना (Saamana) संपादकियातून 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' (Aaj ke Shivaji Narendra Modi) या पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल (Jai Bhagwan Goyal) यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच, भाजपवरही जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. शिवसेना (Shiv Sena) सोयीप्रमाणे भूमिका बदलत नाही. सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्यांनी व शब्द फिरवणाऱ्यांनी याचे भान ठेवले पाहिजे. पंडित नेहरु असतील, नाहीतर मोरारजी देसाई या सगळ्यांनाच शिवछत्रपतींसमोर नतमस्तक व्हावे लागले. 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकावरुन महाराष्ट्रात संतापाची लाट उठल्यावर भाजपवाल्यांना नमते घ्यावे लागले. या वादावर आता पडदा पडावा आणि वाद संपल्यानंतर कुणी पुन्हा जुनी मढी उकरुन काढू नयेत हीच आपेक्षा, असे म्हणत हा वाद पुढे न वाढवण्याची आपेक्षाही सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या पुस्तकावरुन या पुढे वाद वाढू नये अशी आपेक्षा व्यक्त करतानाच लेख जय भगवान गोयल यांच्यावर मात्र तीव्र शब्दांत हल्ला चढविण्यात आला आहे. 'हे वादग्रस्त पुस्तक मागे घेतल्याचे भाजपने जाहीर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाशी भाजपचा संबंध नाही, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडे कर यांना जाहीर करावे लागले. पण, उपटसुंभ गोयल मणतोय, छे,छे पुस्तक मागे घेतले नाही. घेणार नाही. आता लेखक म्हणतो मी पुस्तकाचे नव्याने पुनर्लेखन करणार, म्हणजे गोंधळ सुरुच आहे' असे सांगतानाच 'गोयल हा माणूस खोट्या प्रसिद्धीचा भुकेला आहे. त्याला या प्रकरणात ती प्रसिद्धी मिळाली' असेही सामनात म्हटले आहे.
'महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी लाजत मुरडत निषेध केला'
दरम्यान, जवाहरलाल नेहरु विद्यापीठात स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांची डोकी फोडली जातात व त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. कानपूरला फैज अहमद फैज यांच्या एका कवितेवरुन भाजप समर्थकांनी वाद पेटवला आहे, पण 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हा वादाचा विषय आहे असे कुणाला वाटत नाही. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी लाजत मुरडत निषेध केला. तसा त्यांनी तो केला नसता तर, त्यांची अवस्था बिकट झाली असती, असेही शिवसेना मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामना संपादकियात म्हटले आहे. (हेही वाचा, 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पुस्तक म्हणजे ढोंग, चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना: शिवसेना)
'मुनगंटीवार यांच्या बाळबोध प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच देतील'
या पुस्तक वादादरम्यान भाजपचे एक नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 'पवारांना जाणता राजा कसे म्हणता? असा बाळबोध प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच विचारायला हवा. छत्रपती शिवरायांना 'रयतेचा राजा' असे संबोधले जात असे. जनतेच्या प्रश्नांबाबत व भावनांबाबत खडान्खडा माहिती असलेला लोकनेता म्हणजे 'जाणता राजा' हे पवारांच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांनीच मान्य केले. त्यामुळे मुनगंटीवार यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मोदीच देतील', असा टोला शिवसेनेने मुनगंटीवार यांना लगावला आहे. दरम्यान, सावरकर यांच्याविषयी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेनेला प्रश्न विचारला आहे. पण, सावरकरांविषयी शिवसेनेइतकी थेट भूमिका इतर कोणीही घेतली नसल्याचे सामनात म्हटले आहे.