लोकसभेतील पंतप्रधानांच्या भाषणावर बहिष्कार टाकणाऱ्या शिवसेनेच्या 5 खासदारांवर होणार कारवाई; Rahul Shewale यांची माहिती
Rahul Shewale | | (Photo Credits: Facebook)

नुकतेच लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यात आला. त्याला पंतप्प्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाद्वारे उत्तर दिले. या अविश्वास ठरावाच्या मतदानादरम्यान शिवसेनेच्या (Shiv Sena) खासदारांना व्हीप बजावण्यात आला होता. मात्र यावेळी ठाकरे गटाचे 5 खासदार अनुपस्थित होते त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार आहे. राहुल शेवाळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या भाषणादरम्यान पक्षाच्या अधिकृत निर्देशाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल शिवसेनेशी संलग्न असलेल्या पाच लोकसभा सदस्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.

मुंबईचे खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करत असलेले राहुल शेवाळे यांनी खुलासा केला की, ‘पक्षाने केंद्र सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हिप जारी केला होता. मात्र, त्यावेळी पाच खासदार गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल.’ याबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली जाईल आणि सोमवारी संबंधित खासदारांना औपचारिक नोटिसा पाठवल्या जातील, असेही शेवाळे यांनी सांगितले. (हेही वाचा: Fauzia Khan Slams Modi Government: मोदी सरकारच्या कथनी आणि 'करणी' यात फरक- फौजिया खान)

त्यांनी अधोरेखित केले की पक्ष लोकसभेत एकसंध अस्तित्व म्हणून काम करत आहे. त्यामुळे भावना गवळी यांनी प्रसारित केलेला व्हीप शिवसेना पक्षाच्या सदस्यांनी मानने गरजेचे आहे. काल गुरुवार अविश्वास ठरावावर मतदानावेळी विरोधकांनी सभात्याग केला होता. यावेळी ठाकरे गटाच्या खासदारांनी देखील वॉक आउट केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे.

दुसरीकडे, शिंदे गट कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. माध्यमांनी याबाबत वृत्तही दिले होते. याबाबत शेवाळे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, अशी कुठलीही चर्चा नाही. अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत त्यामुळे यावर चर्चा होण्याचा प्रश्न नाही, असे राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले.