गाझियाबादमध्ये मोबाईल गेमच्या माध्यमातून धर्मांतर केल्या प्रकरणी आरोपी शहानवाजला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. शहानवाज हा त्याच्या भावासोबत अलिबागमधील एका लॉजमध्ये लपून बसला होता. ठाणे पोलीस आणि गाझियाबाद पोलीसांचे पथक अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. गेल्या काही दिवसांपासून फरार असणाऱ्या शहानवाजला ठाणे पोलीसांनी आता अलिबाग येथून अटक केली आहे. तसेच शहानवाजची आता मुंब्रा पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंब्रा पोलिसांनी पोलीस स्थानकाचा बाहेर कडेकोट बंदोबस्त केला आहे.
गाझियाबादमध्ये मोबाईल गेमच्या माध्यमातून धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. विशेष म्हणजे मोबाईल गेमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जवळपास 400 जणांचे धर्मांतर केल्याचा खुलासा गाझियाबाद सहाय्यक पोलिसांनी केला होता. तसेच या धर्मांतराचं कनेक्शन मुंब्र्याशी असल्याचं देखील यावेळी समोर आलं होतं. मुंब्र्यातील 400 जणांचे धर्मांतर केल्याची शक्यता यावेळी पोलीसांनी वर्तवली होती.
गाझियाबादमध्ये व्हिडिओ गेम्सच्या माध्यमातून मुलांचे धर्मांतर केले जात होते. यामध्ये काही गैर-मुस्लिम नावाने प्रोफाईल बनवले जात होते. त्यानंतर हे प्रोफाईल मुलांना गेममध्ये हरवून त्यांना कुराणाचे पठण करण्यास सांगयची. त्यानंतर पुन्हा त्यांच्यासोबत गेम खेळून त्यांना गेममध्ये जिंकवयाची. दरम्यान कुराणाचे पठण केल्यामुळे जिंकल्याचा विश्वास ही टोळी या मुलांमध्ये निर्माण करायची. त्यानंतर कुराणात रस निर्माण होणाऱ्या तरुणांशी गेमिंगच्या माध्यमातून ही टोळी संवाद साधायची आणि त्यानंतर त्यांचे ब्रेन वॉश करायची. या मुलांना इस्लामिक साहित्य देखील पुरवण्यात आले होते.