Nashik Accident: काळाचा घाला! मालवाहू वाहनाने चिरडल्यामुळे दोन तरुणांचा जागीच मृत्यू; नाशिक येथील धक्कादायक घटना
Accident Representational image (PC - PTI)

कामावर निघालेल्या दोन तरूणांना ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना (Road Accident) उघडकीस आली आहे. ही घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वणी (Vani) येथील सापूतारा रस्त्यावर (Saputara Road) आज (28 मार्च) पहाटे घडली आहे. दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने वाहनासह पलायन केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती होताच नाशिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनराज वसंत वाघमारे (वय, 17) आणि राजेश देविदास वाघमारे (वय, 21) असे मृतांची नावे आहेत. हे दोघेही सुरगाणा तालुक्यातील रहिवाशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धनराज आणि राजेश आज पहाटे दुचाकीवरून पिंपळगाव येथील द्राक्ष व्यापाऱ्याकडे कामासाठी जात होते. मात्र, वणी शिवारा येथील परिसरात एका मालवाहू वाहनाने त्यांच्या मोटार दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यावेळी धनराज आणि राजेश या दोघांच्या अंगावरून मालवाहू वाहनाचे चाक गेल्याने त्यांचा चिरडून मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- पुण्यात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याची दगडाने ठेचून हत्या

मृतांचे शवविच्छेदन केल्यानंतर दोघांचेही मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रविण उदे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी शोध घेत आहेत. दोन्ही शेतमजुरावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.