Jogeshwari-Vikhroli Link Road: जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर अपघात, क्रिकेट स्पर्धेला जाताना बालपणीच्या मित्रांवर काळाचा घाला
Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर ( Jogeshwari-Vikhroli Link Road) झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेले दोघेही बालपणापासून एकमेकांचे मित्र आहे. क्रिकेट स्पर्धेसाठी हे दोघे मित्र गोरेगावहून महाडला जात असताना जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर शनिवारी सकाळी भीषण अपघात (Accident on Jogeshwari-Vikhroli Link Road) झाला. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या एका एका ट्रक चालकास पोलिसांनी अटक केली आहे. या चालकावर तो हाकत असलेला रेडी-मिक्स काँक्रीट (RMC) ट्रक बेशिस्तपणे चालवल्याचा आरोप आहे.

अनिल घवळी आणि नीलेश सकपाळ अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही दुचाकीवरुन निघाले होते. या वेळीआरएमसी ट्रकने अचानक यू टर्न घेऊन त्यांना धडक दिली. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले. RMC ट्रक चालक माहुलहून सिमेंट मिक्स घेऊन पवईच्या दिशेने निघाला होता. त्याने JVLR वर डावे बाजूने वळण घेतले. दरम्यान, गांधी नगर येथील उड्डाणपुलाजवळ येत असताना त्याला सिमेंटचे साहित्य दर्जेदार नसल्याने परत येण्यास सांगणारा फोन आला. फोन येताच चालक परत फिरण्यासाठी रस्ता शोधत होता. दरम्यान, त्याला डिव्हायडरमध्ये एक रिकामी जागा मिळाली. त्याचा फायदा घेत त्याने ट्रक वळविण्याचा प्रयत्न केला यात दुचाकीस्वार ट्रकच्या मागच्या चाकाखाली आले आणि अपघात घडला. यात दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा, Mumbai Traffic Update: जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड 13-24 मे वाहतूकीसाठी बंद)

अपघात घडताच ट्रकचालक पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले आणि घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरएमसी ट्रकचा नोंदणी क्रमांक मिळवला. चालकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर IPC च्या कलम 279 (धोकादायक पद्धतीने वाहन हाकने), 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत), 338 (जीव किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या कृतीमुळे गंभीर दुखापत करणे) आणि मोटार वाहन कायदा, 1988 च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.