'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' (Aaj Ke Shivaji Narendra Modi) या पुस्तकावरून तापलेल्या वातावरणात भाजप (BJP) कडून तितकीशी स्पष्ट प्रतिक्रिया अद्याप मांडलेली नाही, मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना, विरोधकांनी हा मुद्दा उगाच ताणल्याचा आरोप करत होणाऱ्या टीकेला उत्तर दिले. जोवर हे ब्रह्मांड आहे तोवर छत्रपती शिवाजी महाराजांची (Chatrapati Shivaji Maharaj) तुलना कोणाशीही होऊ शकत नाहीच मात्र इतर वेळेस त्यांचा केला अपमान कसा खपवून घेतला जातो असे मुनगंटीवार यांनी विचारले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना अनेकदा जाणता राजा म्हंटले जाते, ही उपाधी महाराजांची होती. पवारांच्या कार्यकाळात अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असूनही त्यांना ही उपाधी देणे योग्य आहे का? असाही सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करत आहेत, असा आरोप लागवताना काही पूर्व दाखले दिले आहेत, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या एका पुस्तकात शिवाजी महाराजांची बदनामी केली होती. पण त्यांनी त्यावर स्पष्टीकरण देत वाद लपवून दिला होता. तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 'इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया' असं काँग्रेसचे लोक म्हणायचे. इंदिरा गांधी यांची तुलना दुर्गा मातेशीही करण्यात आली होती. त्याला मात्र याला कुणीच कधीच का आक्षेप घेतला नाही,असे मुंनगंटीवार यांनी विरोधकांना विचारले आहे.
दरम्यान, या तापलेल्या राजकीय वातावरणात आता सोलापूर फौजदारी चावडी ठाण्यात 'आज के शिवाजी नरेंद्र' पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर जगदाळे नावाच्या व्यक्तीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला गेला आहे. तर, पुस्तकाचे लेखक गोयल यांनी हे पुस्तक आपण तेव्हाच मागे घेऊ जेव्हा पक्षाकडून सांगितले जाईल अशी भूमिका घेतली आहे, भाजप मात्र अजूनही याबाबत तटस्थ आहे.