राज्यातील खासगी प्रयोगशाळेतील (Private Laboratories) कोरोना चाचण्यांचे (Corona Tests) दर निश्चिती करण्यासाठी राज्य शासनाकडून 4 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमार्फत 7 दिवसांत कोरोना चाचणी संदर्भात दर निश्चित केले जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सागितलं आहे.
सरकारने राज्यात रुग्णांच्या जास्तीत-जास्त कोरोना चाचण्या करण्यासाठी राज्य आरोग्य हमी सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुल्क निश्चिती समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक अजय चंदनवाले, ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रा.अमिता जोशी या सदस्यांचा समावेश आहे. (हेही वाचा - लॉकडाऊन काळात राज्यात कोविड-19 संदर्भात 1 लाख 23 हजार गुन्ह्यांची नोंद, तर 6 कोटी 54 लाख रुपयांचा दंड; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती)
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आयसीएमआरने आरटी-पीसीआर तपासणीची सुविधा असलेल्या 44 शासकीय आणि 36 खासगी प्रयोगशाळांना कोरोना तपासणीची मान्यता दिली आहे. याशिवाय शासकीय प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी नि:शुल्क करण्यात येत आहे. आयसीएमआरने खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी 4500 रुपये इतका दर निश्चित केला आहे.
दरम्यान, आयसीएमआर सर्व जिल्ह्यातील मान्यता प्राप्त खासगी प्रयोगशाळांशी कोरोना चाचण्यांचे दर निश्चिती करण्यासाठी वाटाघाटी करून सात दिवसात दर निश्चित करतील. जिल्हानिहाय निश्चित केलेले दर ही समिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करेल. त्यानंतर जिल्हाधिकारी दरनिश्चितीसाठी निविदा प्रक्रिया राबवून संबंधित जिल्ह्यांसाठी दर निश्चिती करतील.