Ahmednagar Corona Patient Suicide: अहमदनगर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील गुलमोहर रोडवरील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाग्रस्ताने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली आहे. यात या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मृत पावलेल्या कोरोना रुग्णावर गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. तो अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील रहिवाशी होता. सोमवारी रात्री त्याला अहमदनगर शहरातील सुरभी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर त्याच्यावर उपचार सुरू होते. (हेही वाचा -Raigad Building Collapse: तारिक गार्डन इमारत दुर्घटना प्रकरणी रायगड पोलिसांकडून 5 जणांविरूद्ध गुन्हा दाखल)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाग्रस्त रुग्णाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास खिडकीची काच फोडून खाली उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णाने ही उडी पळून जाण्यासाठी मारली होती की, आत्महत्या करण्यासाठी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात सोमवारी 519 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तर 486 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यात 13,964 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.37 % आहे. सध्या शहरात 3389 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 240 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.