Dahisar railway station (Photo Credit- ANI)

Maharashtra: दहिसर स्थानकातील रेल्वे ट्रॅकवर (Railway Track) अडकलेल्या 60 वर्षीय व्यक्तीचे मुंबई पोलिस कॉन्स्टेबलने प्राण वाचवले. शुक्रवारी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर पडलेला आपला बूट घेण्यासाठी खाली उतरला. तो बूट उचलून त्याने पायात घातला. त्यानंतर अगदी काही सेकंदात त्या प्लॅटफॉर्मवर लोकल आली. मात्र, कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानाने या व्यक्तीचे प्राण वाचले. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला काही सेंकदाचा अवधी लागला असता, तर मोठा अपघात झाला असता. परंतु, सुदैवाने पोलिस कॉन्स्टेबलने या व्यक्तीला वेळीच रुळावरून वर खेचलं.

पायातील बूट घेण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर उतरलेल्या या व्यक्तीला पोलिस कॉन्स्टेबलने रेल्वे जाईपर्यंत रेल्वे रुळाच्या बाजूला थांबण्याच्या सूचना दिल्या. मात्र, तरीदेखील ही व्यक्ती रेल्वे रुळ ओलांडून प्लॅटफॉर्मच्या दिशेने आली. यावेळी पोलीस कॉन्स्टेबलने या व्यक्तीला हात दिला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. (हेही वाचा - महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला जवान लता बनसोडे यांनी रूळावर पडलेल्या प्रवाशाला वाचवण्यासाठी लोकल समोर उडी मारत बजावलं कर्तव्य; पहा ग्रॅन्ट रोड स्थानकातील हा प्रसंग)

या कामगिरीनंतर पोलिस कॉन्स्टेबलचं प्लॅटफॉर्मवर असलेल्या नागरिकांनी कौतुक केलं. हा संपूर्ण प्रसंग दहिसर रेल्वे स्थानकातील कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, आतापर्यंत मुंबई रेल्वे स्थानकात अशाप्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला जवान लता बनसोडे यांनी जीवावर उदार होऊन पश्चिम रेल्वे मार्गावरील ग्रॅन्ट रोड स्टेशनमध्ये चक्कर येऊन रूळावर पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच या कामगिरीमुळे लता बनसोडे यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आलं होतं.