कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा पुरवणारे डॉक्टर, वेद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता जीवापाड प्रयत्न करत आहेत. मात्र, आता वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आणि पोलीस कर्मचारीही कोरोनाच्या कचाट्यात येत असल्याचे समजत आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत (Mumbai) आढळून आले आहेत. दरम्यान, मुंबईत कोरोनामुळे एका 57 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. राज्यात 23 मार्चपासून ते 22 मार्चपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार एकूण 64 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यावेळी यामध्ये 11 पोलीस अधिकारी आणि 53 पोलीस शिपायांचा समावेश होता. या सर्वांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे, 22 एप्रिलला एकाच दिवसात तब्बल 15 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. आता राज्यातील 96 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. याचदरम्यान कोरोनाचा शिरकाव आता महाराष्ट्रातील पोलीस विभागातही झाला आहे. मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचार दरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. मृत पोलीस कॉन्स्टेबलच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. हे देखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रात लॉकडाउनचे आदेश येत्या 3 मे पर्यंत कायम- आरोग्यमंत्री राजेश टोपे
एएनआयचे ट्वीट-
A 57-year-old Head Constable, who tested positive for #COVID19, passed away today in Mumbai: Mumbai Police #Maharashtra pic.twitter.com/PAxaXxZjWw
— ANI (@ANI) April 25, 2020
कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात आतापर्यंत 24 हजार 942 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे 779 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 5 हजार 210 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधीतांची संख्या 6 हजार 817 वर पोहचली आहे. त्यांपैकी 301 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 840 जण कोरोनामुक्त झाले आहेत.