Mahad Building Collapse: रायगड जिल्ह्यातील महाड येथे 5 मजली इमारत कोसळली; 15 लोकांना वाचवण्यात यश, 200 हून अधिक लोक अडकल्याची भीती (Video)
महाड इमारत दुर्घटना (Photo Credit : ANI)

महाराष्ट्रातील रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाड (Mahad) परिसरात 5 मजली इमारत कोसळली (Building Collapse) असल्याची माहिती मिळत. या घटनेनंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आणि दोन डझन सैनिक बचावासाठी दाखल झाले आहेत. इमारत कोसळल्याने झालेल्या ढिगाऱ्याखाली जवळजवळ 150 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीत 47 फ्लॅट असल्याची माहिती आहे व या फ्लॅट्समध्ये साधारण 200 लोक राहत होते. महाडच्या काजळपुरा येथील ही इमारत अवघे 10 वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत बचाव पथकाला 10 ते 15 लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. या सर्व जखमी लोकांना शेजारच्या शासकीय रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

एएनआय ट्वीट -

ही दुर्घटना आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली असून बचावकार्य सुरु झाले आहे. कोसळलेल्या इमारतीच्या मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. मात्र आता अंधार होत असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. महाड दुर्घटनेनंतर तळेगाव दाभाडे येथून एनडीआरएफच्या 3 टीम घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही इमारत नक्की कशामुळे कोसळली याबाबत माहिती मिळू शकली नाही. या दुर्घटनेमधील मृत्यूंची माहिती अजून समोर आली आहे. अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतमध्ये अडकलेल्या काही लोकांशी फोनवरून संपर्क झाला आहे, त्यामुळे सध्या तरी बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.

महाड दुर्घटना व्हिडीओ -

तारीक गार्डन असे या इमारतीच नाव आहे. इमारतीचे दाेन पिलर कमकुवत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे, तसेच या इमारतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे थानिकांचे म्हणणे आहे. ही इमारत मुंबईतील दाेन बांधकाम व्यावसायिकांनी बांधली असल्याचे बोलले जात आहे.