Farmer Suicide in Parbhani: परतीच्या पावसाने सोयाबीनचं नुकसान झाल्याने 24 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
Suicide (pic credit: Wikimedia Commons)

Farmer Suicide in Parbhani: राज्यात परतीच्या पावसामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अगदी हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. अशातचं आता परभणी जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. परभणी जिल्ह्यातील 24 वर्षीय तरुणाने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गुलाब जीवने असं या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. परतीच्या पावसामुळे गुलाब जीवने यांच्या सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. जीवने यांच्यावर खासगी फायनान्सचं कर्ज होते. हे कर्ज कसं फेडायचं? या विवंचनेतून या तरुण शेतकऱ्याने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं.

गुलाब जीवने हे परभणी जिल्ह्यातल्या कौसडी येथील रहिवाशी आहेत. प्राप्त माहितीनुसार, गुलाब जीवने यांची कौसडी येथे अडीच एकर शेती आहे. यावर्षी त्यांनी शेतात सोयाबीनचं पीक घेतलं होतं. मात्र, परतीच्या पावसाने सोयाबीनच्या पिकाचं नुकसान झालं. अशातचं गुलाब जीवने यांच्यावर खासगी फायनान्स कंपनीचे कर्ज होते. पीकाचं नुकसाने झाल्याने हे कर्ज कसं फेडायचं आणि दैनंदिन उदरनिर्वाह कसा करायचा? या सर्व विचाराने गुलाब यांनी आपली जीवनयात्रा संपवली. (हेही वाचा - ऐकावं ते नवलचं! महाराष्ट्रातील 'या' गावातील 32 एकर जमिनीचे मालक आहेत माकडे; गावातल्या प्रत्येक लग्नात दिला जातो विशेष मान, काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या)

गुलाबने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. गावातील लोकांनी गुलाबला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. ग्रामीण रुग्णालयातून गुलाबला परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, गुलाबचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुलाबच्या आत्महत्येने जीवने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सध्या राज्यात परतीचा पाऊस पडत आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच इतर पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिसकावल्याने अनेक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. परभणी जिल्ह्याला लागूनचं असलेल्या बीड जिल्ह्यातदेखील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे.