आजच्या युगात जमिनीचे वाद हे सर्रास झाले असताना महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावातील प्रकरण उत्सुकता निर्माण करणारं आहे. येथे 32 एकर जमीन माकडांच्या नावावर करण्यात आली आहे. या गावात माकडांबद्दल इतका आदर आहे की, काही वेळा लग्नसमारंभात माकडांना जेवण दिले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उपला (Upla) हे गाव माकडांच्या सन्मानामुळे खूप चर्चेत आहे. येथील लोक माकडांना विशेष मान देतात. तसेच त्यांच्या दारात आल्यावर माकडांना अन्नदान करतात. एवढचं नाही तर अनेक विवाह सोहळ्यात लग्न लागण्यापूर्वी त्यांचा सन्मान केला जातो.
उपला ग्रामपंचायतीच्या जमिनीच्या नोंदीनुसार गावात राहणाऱ्या सर्व माकडांच्या नावावर 32 एकर जमीन आहे. गावचे सरपंच बाप्पा पडवळ यांनी पीटीआयला सांगितले की, "जमिनी माकडांच्या मालकीची असल्याचे कागदपत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे, परंतु प्राण्यांसाठी ही तरतूद कोणी केली आणि कधी केली हे माहित नाही."(हेही वाचा - Andheri (East) Bypoll 2022: 'ऋतुजा लटके यांना आमदार होऊ द्या', राज ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र)
पडवळ यांनी सांगितले की, पूर्वी गावात केल्या जाणाऱ्या सर्व विधींमध्ये माकडे होते. गावात आता जवळपास 100 माकडे आहेत. प्राणी एकाच ठिकाणी जास्त काळ राहत नसल्याने त्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी होत आहे. या जमिनीवर वनविभागाने वृक्षारोपण केले असून, त्या भूखंडावर घर होते, ते आता कोसळले असल्याचे त्यांनी सांगितले.
पडवळ यांनी पुढे बोलताना सांगितले की, आधी गावात जेव्हा लग्न होतं असत तेव्हा सर्वात अगोदर माकडांना भेटवस्तू दिली जात असे. त्यानंतर लग्न समारंभ सुरू व्होत असतं. तथापि, आता प्रत्येकजण ही प्रथा पाळत नाही. मात्र, जेव्हा जेव्हा माकडे गावकऱ्यांच्या दारात येतात तेव्हा गावकरी त्यांना खायला घालतात. त्यांना कोणीही खाण्यास मनाई करत नाही.