Pune: पुण्यात 16 वर्षीय मुलीची गळाफास लावून आत्महत्या, पोलीस तपास सुरू
Hanging | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पुण्यात (Pune) 16 वर्षीय मुलीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुणे जिल्ह्याच्या मावळ (Maval) तालुक्यातील देहूरोडमध्ये (Dehu Road) आज दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तसेच पोलिसांनी मृत मुलीचा मोबाईल फोन ताब्यात घेतला असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

स्नेहा वऱ्हाडे (वय, 16) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. स्नेहाने गेल्यावर्षी इयत्ता दहावीची परीक्षा उतीर्ण केली असून ती आपल्या आजीसोबत देहूरोड येथील विकास नगरमध्ये राहत होती. परंतु, स्नेहा आज दुपारी किचेनमध्ये गेल्यानंतर परतलीच नसल्याने तिच्या आजीने बाहेरून तिला आवाज दिला. मात्र, किचेनमधून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तिच्या आजीने आजूबाजुच्या नागरिकांना मदतीसाठी बोलावून घेतले. यातील काहीजणांनी दरवाजा तोडला असता त्यांना स्नेहा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन स्नेहाचा मृतदेह पिंपरी येथील वायसीएस रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. यासंदर्भात न्यूज 18 लोकमतने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Thane: अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडला 'या' कारणामुळे धावत्या ट्रेनमधून ढकलले; वडीलांसह 10 जणांना अटक

याआधी सोमवारी एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत असलेल्या एका तरूणीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाट परिसरात तिने एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमप्रकरणातून संबंधित तरूणीने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.