Navi Mumbai: रायगड (Raigad) जिल्ह्यातून अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील (Mangaon Taluka) पुरर येथील आयएनटी इंग्लिश स्कूल (INT English School) च्या 15 वर्षीय विद्यार्थ्याचा बुधवारी दुपारी सराव सत्रादरम्यान डोक्याला भाला लागल्याने मृत्यू झाला. विद्यार्थी शूजची लेस बांधत असताना ही घटना घडली. शूजची लेस बांधण्यासाठी तो खाली वाकला तेवढ्यात भालाफेकचा सराव सुरू असताना त्याच्या डोक्याला भाला लागला. यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली आहे.
हुजेफा डावरे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो पुरार येथील आयएनटी इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएनटी इंग्लिश स्कूलच्या शाळेच्या मैदानावर सराव सुरू असताना ही घटना घडली. विद्यार्थी भालाफेकचा सराव करत होते. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थी भाला फेकत होते. यावेळी डावरे त्याच्या बुटाची लेस बांधण्यासाठी खाली वाकला. यावेळी दुसऱ्या टोकाकडून फेकलेला भाला त्याच्या डोक्यावर आदळला. (हेही वाचा - Organs Donate: मृत्यूमुळे शरीर संपले, अवयव मात्र जीवंत; डोळे, फुफ्फुस, यकृत, किडनी, मूत्रपिंड कार्यरत, अवयवदानाची कमाल)
माणगाव पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. डावरे तालुकास्तरीय स्पर्धेसाठी सराव करत असल्याचेही त्यांनी सांगितले. माध्यमांशी बोलताना रायगडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे म्हणाले की, ही जीवघेणी घटना कशी घडली हे शोधण्यासाठी पोलिसांनी शाळेच्या मैदानातील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहेत. प्राथमिक तपासणीत डावरे सराव करत असताना भाला आदळल्याने तो जागीच कोसळल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, डावरे याला रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील नागरी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.