94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनावर कोरोनाचं सावट; पुढील 3 दिवसांत निर्णय होण्याची शक्यता
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Photo Credits: Twitter)

राज्यात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाबाबतही (94th All India Marathi Sahitya Sammelan) संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, पुढील 3 दिवसांत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती 94व्या साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी दिली आहे. ABP माझाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. संमेलनाबाबत पुढील 3 दिवसांत छगन भुजबळ साहित्य परिषद, स्थानिक जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभाग यांच्यासोबत चर्चा करतील आणि त्यानंतरच संमेलनाबाबत स्पष्टता येईल, असेही त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, संमेलनाची जय्यत तयारी सुरु आहे. अध्यक्षपदाचे आमंत्रणही जयंत नारळीकरांना गेले असून त्यांच्याकडून मान्यताही मिळाली आहे. शासनाकडूनही 50 लाख रुपयांचा निधी संमलेनासाठी देण्यात आला आहे. मात्र नाशिकमध्ये कोरोना बाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. तसंच स्वातगाध्यक्ष छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संमेलनाबाबत संभ्रमता निर्माण झाली आहे.

तसंच आरोग्याशी तडजोड करुन ठरल्याप्रमाणे साहित्य संमेलन होणे हा आमचा आग्रह नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर संमेलनादरम्यान विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उपस्थितांच्या संख्येपेक्षा दुप्पटीची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसंच प्रत्येकाची आरटीपीसीआर टेस्ट देखील करण्यात येणार आहे. सॅनिटायझिंगची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक दोन तासांनंतर सॅनिटायझिंग केलं जाणार आहे.

साहित्य संमेलन 26, 27 आणि 28 मार्च रोजी होणार आहे. मात्र संमेलन 31 मार्चपूर्वी न झाल्यास निधीची समस्या उद्भवू शकते, हे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी आठवडाभर थांबण्याचे आदेश दिले आहेत. पुढील 3 दिवसांत संमेलनाबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे टकले म्हणाले.