Mumbai Accident: बोरिवलीत रस्ता ओलांडताना वेगवान कारच्या धडकेत 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, चालकाला अटक
Accident (PC - File Photo)

Mumbai Accident: बोरिवली (Borivali) (पश्चिम) येथे गेल्या शनिवारी कारने धडक दिल्याने 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मुकेश शहा रस्ता ओलांडत असताना त्यांना वेगवान कारने (एमएच 02 सीपी 9028) धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी कार चालक नीलेश सोनी (37) याला अटक केली. एफआयआरनुसार, शाह हे माजी व्यापारी बोरिवली (पश्चिम) येथील रॉयल कॉम्प्लेक्समध्ये राहत होते. शनिवारी संध्याकाळी ते इतर व्यक्तींसोबत इमारत विकासाच्या चर्चेसाठी बाहेर पडले होते. बैठक संपवून ते घरी परतत असताना सोनी यांच्या कारने त्यांना धडक दिली.

सोनी यांनी शहा यांना तात्काळ ऍपेक्स हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना तातडीने करुणा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून मृत घोषित केले. दरम्यान, शेजारील लोकांनी बोरिवली पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी शहा यांच्या कुटुंबीयांना यासंदर्भात माहिती दिली. (हेही वाचा - Bhayandar Building Collapsed: भाईंदरमध्ये इमारतीची भिंत कोसळून दोन कामगारांचा मृत्यू)

पोलिसांनी रविवारी सोनीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि 3034 (ए) (निष्काळजीपणामुळे मृत्यू) नुसार गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर सोनीला अटक केली. सोनी यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. शाह यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.