महाराष्ट्र: 5 वी आणि 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 26 चुकीचे प्रश्न वगळून लावणार निकाल! उत्तरसूची www.mscepune.in वर प्रसिद्ध
Representational Image | (Photo Credits: Unsplash.com)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 26  प्रश्न चुकीचे असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाचवीच्या परीक्षेत 13 आणि आठवीच्या परीक्षेत 13 असे एकूण 26 प्रश्न चुकीचे असल्याचे समोर आले आहे. प्रश्नपत्रिका 1 आणि प्रश्नपत्रिका 2 यांमधील हे 26 प्रश्न रद्द करण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला आहे. प्रश्न चुकले म्हणून सरसकट गुण न देता ते वगळून उरलेल्या प्रश्नांचे गुण देऊन अंतिम निकाल देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात 24 फेब्रुवारीला पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा झाली. या परीक्षेला पाचवीसाठी 5,12,667 आणि आठवीसाठी  3,53,317 विद्यार्थी बसले होते. छपाईच्या, भाषांतरातील चुका यामुळे प्रश्नपत्रिकेमध्ये 26 चुकीचे प्रश्न असल्याचे सांगण्यात आले आहे.

उत्तरसूची प्रसिद्ध वेबसाईटवर प्रसिद्ध

शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकांची उत्तरसूची राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेबाबत आक्षेप असल्यास तो ऑनलाईन स्वरूपात नोंदवण्यासाठी 15 मार्च 2019 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.