Balidan Mas 2025 (फोटो सौजन्य - File Image)

Balidan Mas 2025: छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. यंदा शंभूमहाराजांची पुण्यतिथी 29 मार्ज रोजी साजरी करण्यात येणार आहे. संभाजी महाराजांच्या बलिदानाबद्दल शिवप्रेमी दरवर्षी बलिदान मास पाळतात. यंदा पुण्यातील कोंढवे-धावडे (Kondhave-Dhawade) येथे बलिदान मास पाळण्यास सुरुवात झाली आहे. तरुणांमधील वाढेत नैराश्य, व्यसनाधीनता कमी करणे हे यंदाच्या बलिदान मासाचे उद्दिष्ट आहे.

बलिदान मास हा संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या 40 दिवस आधी पाळला जातो. शिवशंभू राजे प्रतिष्ठाणच्या वतीने कोंढवे-धावडे येथील श्रीकोंढवेश्वर मंदिर येथे 18 फेब्रुवारी ते 29 मार्च 2025 पर्यंत 40 दिवस बलिदान मास पाळण्यात येणार आहे. या काळावधीत दररोज सकाळी सव्वा सात वाजता संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि स्मरण करण्यात येईल. (हेही वाचा -Balidan Mas 2025 Date: बलिदान मास कधी आहे? काय आहे यामागचा इतिहास? जाणून घ्या सविस्तर)

या उपक्रमात शिवभुमी भ्रमंती ग्रूप, उत्तमनगर बजरंग दल, कोंढवे धावडे, कोपरे, शिवणे येथील ग्रामस्थ दररोज उपस्थित राहणार आहेत. बलिदान मास काळात शिवप्रेमी 40 दिवस आपल्या आवडीची वस्तू वर्ज करतात. तो एखादा पदार्थ किंवा इतर कोणतीही गोष्ट असू शकते.

औरंगजेबाने शंभूराजांना 40 दिवस कठोर वेदना देऊन मारलं होतं. त्यामुळे या संपूर्ण महिन्यात शिवप्रेमी शंभूराजांच्या बलिदानाचे स्मरण करतात आणि हा महिना सुतक काळाप्रमाणे पाळतात. छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी बलिदान दिले. त्यांचे हे बलिदान आजच्या तरुण पिढीला समजावे, यासाठी बलिदान मास महत्त्वपूर्ण आहे.