Sea Link | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

Most Expensive Road Connecting Mumbai: भारतातील सर्वात लांब सागरी सेतू (Sea Bridge) असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) वर वाहनधारकांना एकेरी 250 रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी 375 रुपये मोजावे लागणार आहेत. ठाणे खाडीवरील शिवडी (Shivdi) ते नवी मुंबई (New Mumbai) या 22 किमी लांबीच्या पुलाचे उद्घाटन येत्या शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते होणार आहे. राज्य सरकारने गुरुवारी गाड्यांवर आकारले जाणारे टोल शुल्क जाहीर केले, मंत्रिमंडळाने एकेरी प्रवासासाठी प्रस्तावित टोल (Toll) मध्ये 500 वरून 250 रुपयांपर्यंत कपात करण्यास मान्यता दिली.

प्राप्त माहितीनुसार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईला जोडणार सर्वात महाग महामार्ग असणार आहे. या महामार्गावर एकेरी प्रवासासाठी कारला 250 रुपये टोल आकारण्यात येणार आहे. दैनंदिन पास एकमार्गी भाड्याच्या 2.5 पट असेल, म्हणजेच 625 रुपये, आणि मासिक पास एकमार्गी भाड्याच्या 50 पट असेल (रु. 12,500 प्रति महिना आणि 1.5 लाख रुपये प्रति वर्ष). (हेही वाचा - Mumbai Trans Harbour Link: ऐतिहासिक क्षण! मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर धावली पहिली बस; CM Eknath Shinde यांनी दाखवला हिरवा झेंडा)

देशातील सर्वात लांब सागरी पूल -

MTHL हा देशातील सर्वात लांब आणि जगातील 12 वा सर्वात लांब सागरी पूल असेल. तो दक्षिण मुंबईला नवी मुंबईतील नवीन विमानतळ आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी जोडेल. प्रवाशांमध्ये टोलबद्दलच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत. काही नागरिकांच्या मते, कनेक्टिव्हिटी पाहता पुलावर आकारण्यात येणारा टोल योग्य आहे. दुसरीकडे शिवसेना (यूबीटी) पूल टोलमुक्त करण्याची मागणी करत आहे. सरकारने या पूलासाठी कर्ज घेतल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, शिवसेना UBT आमदार आदित्य ठाकरे यांनी X वर पोस्ट करत म्हटलं आहे की, बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांना आव्हानः शेजारच्या आवडत्या राज्यात रोजगारनिर्मिती करणारे उद्योग पाठवल्यानंतर, किमान MTHL टोल फ्री ठेवा. महाराष्ट्र टॅक्स भरतो, टोल भरतो आणि त्यांच्या गलिच्छ राजकारणासाठी पैसे देतो... आणि त्यांचे आवडते राज्य, आपला शेजारी, त्यासाठी तयार नसतानाही उद्योग आणि गुंतवणूक स्वीकारण्यास भाग पाडले जाते? तसे, एमटीएचएल, दिघा रेल्वे स्थानक आणि उरण लाइन उद्घाटनाची तारीख अद्याप औपचारिकपणे जाहीर केली गेली आहे का? असंही आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे. (हेही वाचा - Mumbai Trans Harbour Link: मुंबई ते नवी मुंबई जोडणारा ट्रान्स हार्बर लिंक 25 डिसेंबर रोजी जनतेसाठी खुला होणार)

तथापि, कफ परेडच्या एका रहिवाशाने सांगितले की, दक्षिण मुंबईत राहणाऱ्यांनी नवी मुंबई, पेण आणि अलिबागला जाण्यासाठी 250 रुपये भरण्यास हरकत नाही कारण ते मुंबईतील गजबजलेले रस्ते बायपास करू शकते. याशिवाय मुंबई सिटीझन फोरमचे सदस्य आणि मरीन ड्राइव्हचे रहिवासी महेंद्र हेमदेव म्हणाले, सुरुवातीला विरोध होईल पण दक्षिण मुंबईतील लोक हा दुवा स्वीकारतील कारण वेळ वाचेल.