नाशिक (Nashik) वरुन पंढरपूरला (Pandharpur) विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले 24 भाविक कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. इतकंच नाही तर त्यांच्या संपर्कात आलेले गावातील इतर 14 जणांना देखील कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती जानोरी ग्रामपंचायतीने दिली. लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, हे 24 भाविक नाशिक जिल्ह्यातील जानोरी (Janori) गावातील असून सायकल रॅलीने ते पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी आले होते. मात्र यांना कोरोनाची लागण नेमकी कशी, कुठे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या घटनेने गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
हे 24 सायकलस्वार भाविक विठ्ठलाचे दर्शन घेऊन पंढरपूरवरुन आपल्या गावी परतत असताना ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. त्यांच्या संपर्कात आलेल्या 14 जणांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे गावातील कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. नाशिक मधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात 170 जणांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असतानाच ही बातमी समोर येत आहे. यात पोलिस प्रशिक्षणार्थी आणि पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यांच्यावर सध्या नाशिकच्या ठक्कर होम कोविड सेंटर आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापूर्वी नाशिकमध्ये एका तीन महिन्यांच्या बाळाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. (नाशिक मधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात 170 जणांना कोविड-19 ची लागण)
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण पाऊलं उचलली जात आहेत. तसंच ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊन कोविड-19 संसर्ग अधिक बळावू नये, यासाठी 5 जानेवारी पर्यंत राज्यातील पालिका हद्दीत नाईट कर्फ्यूही लावण्यात आला आहे.
कालच्या अपडेटनुसार, राज्यात एकूण 54,891 अॅक्टीव्ह रुग्ण असून 18,04,871 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 94.5% इतका झाला आहे.