सध्या देशामध्ये H3N2 या विषाणूची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या विषाणूमुळे 2 रूग्ण दगावल्याची माहिती दिल्यानंतर सार्याच राज्यांना अलर्ट केले होते. महाराष्ट्रातील पुणे (Pune) शहरामध्ये या विषाणूचे 22 रूग्ण असल्याचे समोर आले आहे. हे जानेवारी ते मार्च मधील रूग्ण असून सर्वाधिक रूग्ण हे वय 19 ते 60 मधील आहेत. सामान्य फ्लू प्रमाणेच या आजाराची देखील लक्षणं आहेत.
पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये तपासणीला आलेल्या 109 संशयित रूग्णांचे नमुने एनआयवी कडे पाठवण्यात आले होते. H1N1 विषाणूचं म्युटेशन होऊन H3N2 विषाणू झाला आहे आणि आता झपाट्याने पसरत असल्याचं पहायला मिळालं आहे. या विषाणूमुळे देशात 2 जण दगावले आहेत. एक जण कर्नाटक तर दुसरा हरियाणा मध्ये होता. आता या विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नक्की वाचा: H3N2 Experts Tips: H3N2 च्या वाढत्या प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये घबराट; विषाणूची लागण रोखण्यासाठी तज्ञांनी दिल्या 'या' महत्त्वाच्या टिप्स, पहा .
कोविड 19 मधून लोकं बाहेर पडत असताना आता हा नवा विषाणू पुन्हा चिंता वाढवत आहे. पण नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. देशात गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्क घालावा असं आवाहन देखील केले आहे. त्याबाबतची नवी नियमावली देखील जाहीर केली आहे.