Jijamata Udyan (Photo Credits: Youtube)

मुंबईत येणा-या पर्यटकांसाठी मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असे पाहण्याचे ठिकाण म्हणजे भायखळ्यातील जिजामाता उद्यान (Jijamata Udyan). या उद्यानात अनेक प्राणी, पक्षी, जलचर प्राणी पाहायला मिळतील. मुंबईतील हे प्रसिद्ध असे प्राणिसंग्रहालय आहे. या उद्यानात आज 2 वाघांचे आगमन होणार आहे. नर-मादीची ही जोडी असून शक्ती आणि करिश्मा अशी यांची नावे आहेत. संभाजीनगर येथून यांना जिजामाता उद्यानात आणण्यात येणार आहे. शक्ती आणि करिश्मा हे दोघे आधी संभाजीनगरमधील सिद्धार्थ गार्डन प्राणी संग्रहालयात होते. तेथून त्यांना आज जिजामाता उद्यानात आणले जाणार आहे. यांच्या बदल्यात जिजामाता उद्यानातील चार ठिपकेदार हरणे संभाजीनगर येथील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात देण्यात येणार आहेत.

सामना ने दिलेल्या वृत्तानुसार, करिश्मा वाघिणीचा जन्म 2014 तर शक्ती वाघाचा जन्म नोव्हेंबर 2016 मध्ये झाला. मुंबईसह सोलापूर प्राणिसंग्रहालयाने वाघाच्या नर-मादीची मागणी केली होती. पण राजधानी मुंबईला त्याबाबतीत प्राधान्य मिळाले.

हेदेखील वाचा- भायखळा येथील राणीच्या बागेत लवकरच होणार बिबट्या आणि तरसाच्या जोडीचे आगमन

जिजामाता उद्यानात या वाघांसाठी विशेष सोय करण्यात आहे. या वाघांच्या बदल्यात ठिपकेदार हरणांचे दोन नर आणि दोन मादी सिद्धार्थ संग्रहालायला देण्यात आल्या आहेत. या दोन वाघांच्या आगमानाने जिजामाता उद्यानात येणा-या पर्यटकांची संख्या आणखी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

याआधी मंगलोर प्राणिसंग्रहालयामधील बिबळ्या, कोल्हा, मोराची जोडी, सूरत प्राणिसंग्रहालयामधील अस्वल आदी राणीच्या बागेत दाखल झाले आहेत. आता डिसेंबरच्या पहिल्या पंधरवडयात राणीच्या बागेत बिबटया आणि तरसाची प्रत्येकी एक जोडी दाखल होणार आहे.