Ranichi Baug (Photo Credits: File)

मुंबईकरांसाठी तसेच विशेष करुन बच्चे कंपनीसाठी प्रेक्षणीय स्थळ म्हणजे भायखळ्यातील राणीची बाग. भायखळ्यातील या वीरमाता जिजाबाई (Veer Jijamata Udyan) भोसले प्राणिसंग्रहालयात पुढील महिन्यात बिबट्या आणि तरसाच्या जोडीचे आगमन होणार आहे. लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार, हे प्राणी म्हैसूर संग्रहालयातून राणीच्या बागेला भेट देण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन नवीन पाहुण्यांची राणीच्या बागेतील कर्मचारी तसेच मुंबईकरही आतुरतेने वाट पाहत आहे. यासाठी विशेष तयारी सुरु झाली आहे.

मुंबईत तशी प्रेक्षणीय स्थळे तशीच बरीच आहेत. पण त्यात नेहमी आवर्जून एका ठिकाणाचे नाव घेतले जाते ते म्हणजे राणीची बाग. सध्या या बागेच्या नुतनीकरणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे.

हेदेखील वाचा- आरे वसाहतीत सुरु होणार नवी 'राणीची बाग'

या प्रकल्पाअंतर्गत देशविदेशातील वन्यप्राणी प्राणिसंग्रहालयात आणण्यातयेणार आहेत. या प्राण्यांसाठी पिंजरे उभारण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. राणी बागेत दाखल झालेले हम्बोल्ट पेंग्विन पर्यटकांचे आकर्षण बनले असून त्यामुळे राणी बागेच्या महसुलातही लक्षणीय वाढ झाली आहे.

याआधी मंगलोर प्राणिसंग्रहालयामधील बिबळ्या, कोल्हा, मोराची जोडी; सूरत प्राणिसंग्रहालयामधील अस्वल आदी राणी बागेत दाखल झाले आहेत. आता डिसेंबरच्या पहिल्या पंधरवडय़ात राणी बागेत बिबटय़ा आणि तरसाची प्रत्येकी एक जोडी दाखल होणार आहे.

त्याचबरोबर आता लवकरच मुंबईत अशाच एका मोक्याची ठिकाणी एक नवीन 'राणीची बाग' सुरु करण्यात येणार आहे. आरे वसाहतीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंग्रहालय विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम उपनगरातील लोकांना प्राणीसंग्रहालय पाहण्यासाठी थेट भायखळ्याच्या जिजामाता उद्यानापर्यंत यावे लागते. मात्र तेथील रहिवाशांसाठी उत्तम दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी आरे कॉलनीत हे प्राणीसंग्रहालय विकसित करण्यात येणार आहे.