महाराष्ट्रातून आतापर्यंत 191 रेल्वे गाड्यांनी 2,45,000 परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात सोडण्यात आलं आहे. या मजुरांच्या तिकिटासाठी 55 कोटी रुपयांचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून (Chief Ministers Relief Fund) देण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मजूरांच्या रेल्वे तिकीटाचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात येतील असं स्पष्ट केलं होतं.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात आतापर्यंत तीनवेळा लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे देशात विविध राज्यात मजूर अडकून पडले आहेत. या मजूरांना आपल्या गावी जाण्यासाठी सरकारने श्रमिक विशेष रेल्वे गाड्या सोडल्या. या रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून अनेक कामगार, विद्यार्थी, मजूरांना आपल्या राज्यात सोडण्यात आले आहे. याशिवाय राज्यात अनेक ठिकाणी स्थलांतरित मजूरांसाठी रिलीफ कॅम्पची उभारणी करण्यात आली आहे. या रिलीफ कॅम्पमध्ये मजूरांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. (हेही वाचा - Coronavirus: महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 29,100, आज दिवसभरात 1,576 नव्या रुग्णांची नोंद; 49 जणांचा मृत्यू)
आजपर्यंत महाराष्ट्रातून 191 रेल्वे गाड्यांनी 2,45,000 परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात सोडले. या मजुरांच्या तिकिटाचे 55 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात आले आहेत.#MaharashtraGovtCares#WarAgainstVirus
(1/2) pic.twitter.com/SrkIrypBq7
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 16, 2020
दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 29,100 इतकी झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात कोरोना व्हायरस संक्रमित 1,576 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 49 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1,068 इतकी झाली आहे.