Coronavirus Outbreak | Representational Image| (Photo Credits: IANS)

जालना (Jalna) जिल्ह्यात 18 जणांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे. यात पोलीस दलातील 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 308 वर पोहचली आहे. जालन्यात आतापर्यंत आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मंगळवारी कोविड रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बाधितांपैकी 14 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी माहिती दिली आहे. जालना जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 308 इतकी असून यातील 185 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याशिवाय सध्या जिल्ह्यात 108 रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - COVID19 Updates Maharashtra Today: महाराष्ट्रात 1 लाख 13 हजार 445 जणांना कोरोनाची लागण; राज्यात आज 2 हजार 701 नव्या रुग्णांची नोंद तर, 81 मृत्यू)

3 जून रोजी जालन्यात कोरोना संशयिताचा मृत्यू झाला होता. परंतु, मृत्यूनंतर या रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या व्यक्तीच्या अंत्यविधी उपस्थित असणाऱ्या 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. (हेही वाचा - Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ठाणे येथील COVID19 रुग्णालयाचे ऑनलाईन उद्घाटन)

जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी 2 हजार 701 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 81 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 13 हजार 445 इतकी झाली आहे. यातील 5 हजार 537 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 57 हजार 851 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.