महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचे (Coronavirus) जाळे वेगाने पसरत चालले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहे. या महामारीचा प्रभावीपणे सामना करता यावा आणि कोविड बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करता यावे यासाठी ठिकठिकाणी कोविड-19 रुग्णालय उभारण्याचे काम सुरु आहे. यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज ठाणे येथील कोविड19 रुग्णालयाचे (COVID19 Hospital in Thane) ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, या रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहे. तसेच या रुग्णालयात इतर सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
या रूग्णालयामध्ये एकूण 1 हजार 24 बेड्स उपलब्ध आहेत. यांपैकी 500 बेड्स हे सेंट्रल ऑक्सिजनची सुविधा असलेले आहेत. यातील 76 बेड्स हे आयसीयूचे असून 10 बेड्स डायलिसिस रूग्णांसाठी तर, 10 बेडस ट्रॉमासाठी ठेवण्यात आलेले आहेत. आवश्यकता वाटल्यास या रूग्णालयामध्ये अतिरिक्त 300 बेड्स निर्माण करता येऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे, या ठिकाणी कोविड रूग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार असून रूग्णांना युनिफार्म, पॅथालाजी लॅब, एक्स रे, कोरोना टेस्टींग लॅब आणि मनोरंजनासाठी टीव्ही तसेच लॉकर्सचीही सुविधाही आहे. त्याचप्रमाणे सुमारे 1 हजार किलोवॅट क्षमतेची जनरेटर्सची सुविधाही निर्माण करण्यात आली आहे. हे देखील वाचा- Lockdown In Bhiwandi: भिवंडी येथे उद्यापासून 15 दिवसांचा विशेष लॉकडाऊन- महापौर प्रतिभा पाटील
मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विट-
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज कोविड-१९ महामारीचा प्रभावीपणे सामना करता यावा आणि कोविड बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करता यावे यासाठी उभारलेल्या ठाणे येथील कोविड रुग्णालयाचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. pic.twitter.com/VKJkObcOyL
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 17, 2020
देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. महाराष्ट्रात मंगळवारी रात्रीपर्यंत 2 हजार 701 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 13 हजार 445 वर पोहचली आहे. यापैकी 5 हजार 537 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 57 हजार 851 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे