Lockdown In Bhiwandi: भिवंडी येथे उद्यापासून 15 दिवसांचा विशेष लॉकडाऊन- महापौर प्रतिभा पाटील
Bhiwandi | PM Narendra Modi (Photo Credit: BNCMC)

भिवंडी (Bhiwandi) आणि परिसरात वाढत असलेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या विचारात घेऊन या ठिकाणी विशेष लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उद्या म्हणजेच गुरुवर, 15 जून पासून 3 जुलै 2020 पर्यंत भिवंडी शहरातील लॉकडाउन (Lockdown In Bhiwandi) कायम असणार आहे. महत्त्वाचे असे की, ‘मिशन बिगिन अगेन’ (Mission Begin Again) अर्थातच 'पुनश्च हरीओम' म्हणूत राज्य सरकार लॉकडाऊन शिथिल करण्याचा प्रयत्न करत असताना भिवंडीत मात्र कडक लॉकडाऊन (Lockdown) अवलंबला जाणार आहे. भिवंडी शहरात मंगळवारी संध्याकाळपर्यंत करोनाचे 650 रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, राज्यभरात 1 जूनपासून लागू असलेला लॉकडाऊन भिवंडी शहरातही लागू आहे. तरीही भिवंडी शहरात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन महानगरपालिका सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. सोशल डिस्टन्सिंग, कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि नागरिकांचे आरोग्य हे मुद्दे प्रामुख्याने चर्चेत होते. (महाराष्ट्र कोरोना व्हायरस संपूर्ण चित्र आकडेवारीसह इथे पाहा)

सर्वसाधारण सभेत तीन तास चाललेल्या दीर्घ चर्चेनंतर पिठासन अधिकारी महापौर प्रतिभा पाटील यांनी सभागृहाच्या संमतीने येत्या गुरुवारपासून पंधरा दिवसांकरीता विशेष लॉकडाऊन जाहीर करीत असल्याची घोषणा केली. या वेळी पालिकेतील जवळपास सर्वपक्षीय नगरसेवकांनी भिवंडी शहरात वाढत असलेल्या कोरोना व्हायरस रुग्णसंख्येबाबत प्रशासनाला धारेवर धरले. तसेच, प्रश्नांचा भडीमार केला.

दरम्यान, भिवंडी शहर हे अत्यंत दाटीवाटीची लोकसंख्या असलेले शहर आहे. त्यामळे या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग अधिक प्रभावीपणे अंमला आणता येत नाही. अशा वेळी कोरोना व्हायरस श्रृंखला तोडायची असेल तर 15 दिवसांचा अधिक कडकडीत लॉकडाऊन पाळणे महत्त्वाचे आहे, असा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. त्यासोबतच आयुक्तांनीही या लॉकडाऊनला सहमती दर्शवली.

दरम्यान, लॉकडाऊन असला तरी जीवनावश्यक वस्तुंची दुकाने जसे की, मेडिकल आणि दूध, किराणा दुकानं वैगेरे ठराविक वेळेतच सुरु राहतील. त्याबाबत पोलीस, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारलाही कळविण्यात आले असल्याची माहिती महापौर प्रतिभा पाटील यांनी दिली आहे.

यादरम्यान शहरातील सर्व रस्ते पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. महापालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी सर्वांना काळजी घेण्याचं गरजेचं असल्याने फक्त मेडिकल आणि दूध, किराणा दुकानं ठराविक वेळेसाठी सुरु राहतील असं सांगितलं आहे. याबाबत पोलीस, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारला कळवण्यात आलं असल्याचं प्रतिभा पाटील यांनी सांगितलं आहे.