कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरी राहणे अत्यंत आवश्यक आहे असे वारंवार सरकारकडून सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन (Lock Down) सुद्धा जारी करण्यात आला आहे, मात्र काही नागरिक सतत या नियमाचे उल्लंघन करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालण्याचे काम करत आहेत. असाच प्रकार आता पुण्यात पुन्हा घडल्याचे समजत आहे. पुणे (Pune) येथील गणेश पेठ (Ganesh Peth) परिसरात काही मुस्लिम नागरिकांनी (Muslim) नमाज पठणासाठी गर्दी केली होती. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी जाऊन 17 जणांना ताब्यात घेतले आहे, खबरदारीचा मार्ग म्हणून या सर्वांना पुण्याच्या नायडू रुग्णालयात (Naidu Hospital) कोरोना चाचणीसाठी (Corona Test) पाठवण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार यापैकी काही नागरिक हे रांचीचे रहिवाशी आहेत. तर 4 जण हे पुण्याचे स्थानिक आहेत.
दुसरीकडे, पुण्यातील भवानी पेठ कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. भवानी पेठेत आतापर्यंत 47 कोरोना रुग्ण सापडले आहेत. सध्या पालिका आरोग्य विभागाकडून जोरदार आरोग्य तपासणी केली जात आहे. अशी परिस्थिती असताना सुद्धा पुन्हा पुन्हा लॉक डाऊनचे पालन न केले जाणे हे धोकादायक आहे. यापूर्वी सुद्धा पुण्यातच एका इमारतीच्या गच्चीवर लोकांनी नमाज पठणासाठी गर्दी केल्याचे समोर आले होते.
दरम्यान, देशभरातील कोरोना बाधितांचा आकडा आता 7447 वर पोहचला आहे, मागील अवघ्या 24 तासात देशात कोरोनाचे 1035 नवे रुग्ण आणि 40 बळी समोर आले आहेत. तर महाराष्ट्रात आज औरंगाबादेत कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत तर मुंबई मधील रुग्णसंख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे, महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या काल पर्यंत (10 एप्रिल) 1574 होती. कालच्या दिवसभरात 210 नवे रुग्ण आढळून आले. तर 188 रुग्ण या आजारातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.