पुणे: लॉकडाऊनचे आदेश धुडकावून नमाज पठणासाठी एकत्र जमलेल्या 13 आरोपींवर गुन्हा दाखल
Maharashtra Police (Photo Credits: Facebook)

लॉकडाऊनचे (Lockdown) आदेश धुडकावून लावणाऱ्या पुणे (Pune) येथील 13 आरोपींसह 20-25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) भागातील चिखाली येथे हे सर्वजण एकत्र जमले होते. 27 मार्च (शुक्रवार) रोजी नमाज पठणासाठी यांनी इमारतीच्या गच्चीवर गर्दी केली होती. त्यामुळे चिखाली पोलिस स्टेशनमध्ये (Chikhali Police Station) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नये आणि गर्दी करु नये असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. मात्र तरी देखील नियमांचे उल्लंघन करत अनेकजण एकत्र येताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांना कारवाई करण्याशिवाय पर्याय उरत नाही.

यापूर्वीही अनेक ठिकाणांहून लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांवरच पलटवार केला जात आहे. सोलापूर येथेही यात्रा साजरी करण्यास विरोध केल्याने जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली होती. (सोलापूर: जमावबंदीचा आदेश मोडून यात्रा साजरा करण्याचा प्रयत्न, गर्दी पांगवली असता पोलिसांवर गावकऱ्यांकडून दगडफेक)

ANI Tweet:

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची दहशत आहे. भारतासह महाराष्ट्रातही कोरोनाने आपले प्रस्थ वाढवायला सुरुवात केली आहे. मात्र या संकटाला दाहक स्वरुप येऊ नये म्हणून देश 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे या संकटाचे गांभीर्य वेळीच ओळखून सरकारने आणि आरोग्य यंत्रणांनी दिलेल्या नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियम पाळल्यानेच आपण कोरोना विरुद्धचा लढा जिंकू शकतो.