Coronavirus (Photo Credits: Pixabay)

देशभरात कोरोना बाधितांच्या (Coronavirus) आकडेवारीत सर्वात मोठी वाढ झाली असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. मागील 24 तासात कोरोनाचे 1035 नवे रुग्ण समोर आले असून सद्य घडीला भारतात 7447 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर अन्य 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, एकूण आकडेवारीत सद्य घडीला 6565 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, 643 जणांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आतापर्यंत कोरोनाने देशात 239 बळी घेतले आहेत. ही आकडेवारी निश्चितच चिंताजनक असली तर कोरोनाच्या अधिकाधिक चाचण्या केल्याने संबंधित वाढ समोर येत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा फटका हा महाराष्ट्र राज्याला बसला आहे. राज्यात कालपर्यंत कोरोनाची एकूण रुग्ण संख्या 1574 झाली होती. यातील 188 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले तर 72 जणांना यामध्ये प्राण गमवावे लागले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरात लॉक डाऊन लागू करण्यात आले असून जर का येत्या 14 एप्रिल पर्यंत तरी लोकांनी या लॉक डाऊन नियमाचे काटेकोरपणे पालन केले तरी परिस्थिती आटोक्यात राहील अशी अपेक्षा आहे. आवश्यकता भासल्यास हा लॉक डाऊन कालावधी वाढवला सुद्धा जाऊ शकतो. ओडिशाच्या पाठोपाठ पंजाबमध्येही 1 मे पर्यंत लॉक डाऊन जाहीर; मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची घोषणा

आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी (ANI ट्विट)

दरम्यान, जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 15 लाख 96 हजार 496 वर पोहचली आहे. यांपैकी 95 हजार 505 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाख 54 हजार 6 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतही आता कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे.