एकीकडे पावसाळा तोंडावर आला आहे, तर दुसरीकडे कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमित रुग्णांच्या संख्येत अजूनही दिवसेदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात बाधित असलेले शहर, मुंबई (Mumbai) मध्ये आज कोरोना व्हायरसच्या 1438 रुग्णांची व 38 मृत्यूंची नोंद झाली आहे. शहरात आज 763 लोक या आजारातून बरे झाले आहेत. अशा प्रकारे मुंबईमधील एकूण रुग्णांची संख्या 35,273 झाली आहे. बीएमसीने (BMC) याबाबत माहिती दिली. शहरात आज एकूण 839 संशयित रुग्णांना भर्ती करण्यात आले आहे. आजच्या 38 मृत्युंसह एकूण मृत्यूंची संख्या 1135 झाली आहे.
बरील 38 मृत रुग्णांपैकी 24 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 19 रुग्ण पुरुष व 13 रुग्ण महिला होत्या. मूत्यू झालेल्या रुग्णांपैकी 3 चे वय 40 वर्षाखाली आहे व 12 रुग्णांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे. तर उर्वरित 17 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 28% असून, मृत्यूदर 3.2 आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक प्रभावित क्षेत्रांपैकी एक असलेल्या धारावी झोपडपट्टीमध्ये आज 36 जणांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली. अशाप्रकारे इथली एकूण कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 1675 इतकी झाली आहे. धारावी परिसरात कोरोना व्हायरस संक्रमित 61 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
एएनआय ट्वीट -
1438 persons have tested positive for #COVID19 in Mumbai today; taking the total number of cases to 35,273. Total toll rises to 1135 after 38 deaths were reported today: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #Maharashtra pic.twitter.com/ivyiYs12tb
— ANI (@ANI) May 28, 2020
दरम्यान, मुंबईतील 24 पैकी सहा वॉर्डात कोरोना विषाणूची लागण झालेली 14 हजाराहून अधिक प्रकरणे असल्याची माहिती, बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रभागनिहाय गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, या सहा प्रभागात प्रत्येकी 2000 हून अधिक कोरोनाग्रस्त आहेत.
राज्याबद्दल बोलायचे झाले तर, राज्यात आज कोरोनाच्या 2598 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात 38, 939 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 698 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत 18, 616 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत 59, 546 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.